नागपुरात बसमधील तिकीट मशीन हिसकावून पळणारा तरुण अटकेत!

गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई; गिट्टीखदानमधील जबरी चोरीचा गुन्हा उघड, १० हजारांची मशीन जप्त
नागपूर | सिटी न्यूज
नागपूर शहरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत बसमधील तिकीट काढण्याची मशीन जबरदस्तीने हिसकावून पळून गेलेल्या तरुणाला गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक २ ने ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी अंदाजे १० हजार रुपये किमतीची तिकीट मशीन जप्त केली असून, जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
बसमधील तिकीट मशीन हिसकावून आरोपी फरार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीच्या हातातील बसचे तिकीट काढण्याचे मशीन जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ८०७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
कळमेश्वर येथून आरोपी ताब्यात
या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ च्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत आरोपी कळमेश्वर परिसरातील टीचर कॉलनीत आपल्या नातेवाइकाच्या घरी लपून बसल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध घेऊन प्रेम ऊर्फ दादू विजय पाटील (वय २०, रा. भिवसनखोरी, चिंतामण नगर, नागपूर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून काळ्या आणि केसरी रंगाची तिकीट काढण्याची मशीन दोन पंचांच्या उपस्थितीत जप्त करण्यात आली.
पुढील तपास सुरू
जप्त केलेली मशीन पुढील कारवाईसाठी गिट्टीखदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक २ च्या कारवाईमुळे जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
सिटी न्यूज | नागपूर



