सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये लिफ्ट बंद; डायलिसिस रुग्णांची गैरसोय वाढली

अमरावती : अमरावतीच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अर्थात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मागील चार ते पाच महिन्यांपासून लिफ्ट बंद असल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या अडचणी वाढल्या आहेत. विशेषतः डायलिसिससाठी नियमितपणे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
डायलिसिससाठी येणाऱ्या अनेक रुग्णांना व्हिलचेअरच्या सहाय्याने दुसऱ्या मजल्यावर उपचारासाठी नेले जाते. मात्र लिफ्ट उपलब्ध नसल्याने रुग्णांना जिन्यांवरून वर नेण्याची वेळ त्यांच्या नातेवाईकांवर येत आहे. त्यामुळे रुग्णांच्या कुटुंबीयांची अक्षरशः दमछाक होत असून, गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी रुग्णालयातील जॉन्सन कंपनीची लिफ्ट खराब झाली होती. त्यानंतर रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी एविनाटेक कंपनीची नवीन लिफ्ट बसवण्यात आली. मात्र नवीन लिफ्ट बसवूनही ती अद्याप कार्यान्वित झालेली नसल्याने रुग्णांच्या अडचणी कायम आहेत.
डायलिसिससारख्या नियमित आणि महत्त्वाच्या उपचारासाठी रुग्णांना वारंवार रुग्णालयात यावे लागते. अशा परिस्थितीत प्रत्येक वेळी लिफ्ट बंद असल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
नवीन लिफ्ट बसवण्यात आली असेल तर तिची आवश्यक तांत्रिक प्रक्रिया आणि तपासणी तातडीने पूर्ण करून ती रुग्णांच्या सेवेत सुरू करावी, अशी मागणी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून होत आहे. रुग्णालय प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन लिफ्टचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



