धंतोलीत चाकूचा धाक दाखवत पैसे मागणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

वर्धा रोडवरील राजहंस होमिओ क्लिनिकसमोरील घटना; आरोपीकडून चाकू जप्त, गुन्हा दाखल
नागपूरच्या धंतोली परिसरात हातात चाकू घेऊन नागरिकांना धमकावत पैसे मागणाऱ्या इसमावर धंतोली पोलिसांनी कारवाई केली. वर्धा रोडवरील राजहंस होमिओ क्लिनिकसमोरील रस्त्यावर हा प्रकार घडला. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून चाकू जप्त करून त्याला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना फोनद्वारे माहिती मिळाली होती की, कार्तिक उर्फ काल्या राजू एलपुलवार हा हातात चाकू घेऊन नागरिकांकडून दारू व खाण्यासाठी पैसे मागत असून, त्यांना भयभीत करत असल्याचे सांगण्यात आले. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक साईनाथ रामोड यांच्या मार्गदर्शनाखाली नाईट ऑफिसर शुभम बकाल, पोलीस हवालदार योगेश शांभारे आणि डीबी पथकाला घटनास्थळी रवाना करण्यात आले.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्या हातात चाकू असल्याचे निदर्शनास आले. आरोपीने पोलिसांनाही धमकी दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी चाकू ताब्यात घेत आरोपीला धंतोली पोलीस ठाण्यात आणले.
या प्रकरणी अपराध क्रमांक २४५/२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, ३५१(३), भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ४/२५ आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा धंतोली पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.



