
पक्षाचा दैनंदिन खर्च आणि आंदोलनांचा खर्च भागवण्यासाठी निधी उभारणी; QR कोड, चेकद्वारे निधी संकलन
नागपूर शहर काँग्रेसने पक्षाचा दैनंदिन आणि मासिक खर्च भागवण्यासाठी क्राऊड फंडिंग अभियान सुरू केले आहे. या उपक्रमांतर्गत पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्या क्षमतेनुसार दर महिन्याला पक्षासाठी निधी देणार आहेत. पक्षाच्या विविध उपक्रमांसह आंदोलनांचा खर्च भागवण्यासाठी या निधीचा वापर केला जाणार असल्याची माहिती शहर काँग्रेस अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी दिली.
या अभियानांतर्गत पदाधिकाऱ्यांना किमान ५०० रुपयांपासून त्यांच्या क्षमतेनुसार पक्षनिधी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पक्षाच्या कार्यालयासह विविध ठिकाणी QR कोड उपलब्ध करून देण्यात आले असून, चेकच्या माध्यमातूनही निधी स्वीकारला जात आहे. काँग्रेस विचारांशी संबंधित नागरिकांकडूनही ऐच्छिक स्वरूपात निधी देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
गुडधे पाटील यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे अडीच लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. यापूर्वी पक्षाच्या खर्चाचा मोठा भाग शहराध्यक्षांकडून केला जात होता. मात्र, आता पक्षाचा आर्थिक भार केवळ एका व्यक्तीवर न ठेवता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सहभागातून खर्च भागवण्याची भूमिका घेण्यात आली आहे.
या उपक्रमातून जमा होणाऱ्या निधीचा हिशोब दर महिन्याला कार्यकर्त्यांसमोर मांडला जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. नागपूर काँग्रेसने पक्षाच्या संघटनात्मक कामकाजासाठी जनसहभागातून निधी उभारण्याचा हा उपक्रम सुरू केला आहे.



