शेतकरी संकटात, अधिकारी-नेते एसीमध्ये; रविकांत तुपकरांचा आरोप

बुलढाण्यातील पिकांच्या नुकसानीचा मुद्दा; शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची थेट मदत देण्याची मागणी
बुलढाणा जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा मुद्दा उपस्थित करत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकार आणि प्रशासनावर निशाणा साधला आहे. शेतकरी संकटात असताना अधिकारी आणि नेते एसी खोल्यांमध्ये बसून काजू-बदाम खात असल्याचा आरोप तुपकर यांनी केला आहे. प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करण्याची मागणीही त्यांनी केली.
पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून, केवळ कागदोपत्री पंचनामे न करता प्रशासनाने प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करावी, अशी भूमिका तुपकर यांनी मांडली. सोयाबीनसह इतर पिकांच्या नुकसानीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी त्यांनी केली.
शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची थेट आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच बुलढाणा जिल्ह्यातील परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी तुपकर यांनी केली आहे. शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळाली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि नुकसानीच्या प्रमाणानुसार तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.



