citynewsFarmersCrisisWashim

वाशिममध्ये पावसाअभावी सोयाबीन उद्ध्वस्त; शेतकऱ्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

४५ ते ५० दिवस पावसाने दडी मारल्याचा दावा; हेक्टरी एक लाखांची मदत, पीक विमा आणि कर्जमाफीची मागणी

वाशिम : वाशिम जिल्ह्यात पावसाने तब्बल ४५ ते ५० दिवस दडी मारल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. मालेगाव तालुक्यातील राजुरा शिवारात पावसाअभावी सोयाबीनचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. उभ्या पिकाची झालेली अवस्था पाहून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उध्वस्त सोयाबीनची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत राजुरा येथील स्मशानभूमीत अंत्यविधी केला.

सोयाबीन पिकाच्या शेंगा भरण्याच्या निर्णायक टप्प्यातच पावसाने पाठ फिरवल्याने पिके वाळून गेल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. उभे पीक डोळ्यांसमोर करपताना पाहावे लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.

शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी एक लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, पीक विम्याचा लाभ मिळवून द्यावा, कृषी पंपांचे वीज बिल माफ करावे तसेच कर्जमाफी करावी, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष दामू इंगोले यांनी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी केली.

सोयाबीनसोबतच तूर, कापूस, उडीद आणि हळद या पिकांनाही पावसाअभावी मोठा फटका बसल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पीक नुकसानीचे पंचनामे करून वाशिम जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली.

मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी गावपातळीवर प्रत्यक्ष पाहणी करेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. खरीप हंगाम हातातून गेल्याने आता रब्बी हंगामाचीही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. वर्षभराचा संसार कसा चालवायचा, या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीची मदत मिळणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button