AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत सोशल मीडियावर शस्त्रांचे प्रदर्शन; राजापेठ पोलिसांची मोठी कारवाई!

चारचाकीतून घातक शस्त्रांचे प्रदर्शन करणारे चार जण ताब्यात; पाच चाकूंसह १० लाखांची किया सेल्टॉस जप्त

अमरावती : सोशल मीडियावर हातात घातक शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणारा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजापेठ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. चारचाकी वाहनातून प्राणघातक शस्त्रांचे प्रदर्शन करून सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण केल्याचा आरोप असलेल्या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच लोखंडी चाकूंसह तब्बल १० लाख रुपयांचे वाहन जप्त केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर काही युवकांकडून घातक शस्त्रांचे प्रदर्शन करत दहशत निर्माण करणारा व्हिडीओ समोर आला होता. व्हिडीओची दखल घेत राजापेठ पोलिसांनी संबंधित आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी संशयितांची ओळख पटवत त्यांच्याविरोधात कारवाई केली.

राजापेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या आदेशानुसार DB पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणात आदित्य संतोष लडे, आदित्य पुरुषोत्तम कडू, सम्मक सुरेश ढोके आणि भावेश किशोर गोंडाने या चौघांविरुद्ध आर्म्स अॅक्ट तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाच चाकू आणि १० लाखांची कार जप्त

पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपींकडून पाच लोखंडी चाकू आणि किया सेल्टॉस कार असा एकूण १० लाख ३ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तपासादरम्यान वाहनाबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित वाहन काकांना न सांगता नेल्याची माहिती आरोपीने चौकशीदरम्यान दिली आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास राजापेठ पोलिसांकडून सुरू असून, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमागील नेमकी पार्श्वभूमी आणि संबंधित आरोपींच्या भूमिकेचा तपास केला जात आहे.

शस्त्रांचे प्रदर्शन करणाऱ्यांना पोलिसांचा इशारा

सोशल मीडियावर घातक शस्त्रांचे प्रदर्शन करून दहशत निर्माण करणाऱ्यांसह अशा प्रकारचे व्हिडीओ तयार करून व्हायरल करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा राजापेठ पोलिसांनी दिला आहे.

सार्वजनिक ठिकाणी शस्त्रांचे प्रदर्शन करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून पोलिसांनी दिला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button