AmravaticitynewsCrime NewsLatest NewsMaharashtraMaharashtraCrime

अमरावतीत जबरी चोरीचा छडा! दोन आरोपी अटकेत, चोरीची दुचाकी आणि कोयता जप्त

वाळकी रोडवर चाकूचा धाक दाखवत दुचाकी लुटली; तांत्रिक तपास, CCTV आणि गुप्त माहितीच्या आधारे नांदगाव पेठ पोलिसांची कारवाई

अमरावती : जबरी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत नांदगाव पेठ पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीची दुचाकी तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले शस्त्र जप्त केले आहे. या प्रकरणात एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचाही सहभाग निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर रोजी वाळकी रोड परिसरात फिर्यादी मोबाईलवर बोलत उभे होते. यावेळी आरोपींनी त्यांना चाकूसारख्या वस्तूचा धाक दाखवत त्यांच्याकडील हिरो पॅशन प्रो दुचाकी जबरीने चोरून नेली. घटनेनंतर फिर्यादीच्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल होताच नांदगाव पेठ पोलिसांनी तपासाला वेग दिला. आरोपींचा माग काढण्यासाठी तांत्रिक तपास, परिसरातील CCTV फुटेज आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीचा आधार घेण्यात आला.

या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती संशयितांची माहिती लागली. त्यानंतर ऋषिकेश उर्फ दुर्लभ प्रमोद भलावे आणि प्रशिक उर्फ जय प्रतिक वासनिक यांना अटक करण्यात आली.

७२ हजारांचा मुद्देमाल जप्त

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी चोरीची दुचाकी, एक इलेक्ट्रिक मोपेड, मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेला कोयता असा एकूण ७२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांच्या तपासात या गुन्ह्यात एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार संबंधित बालकाबाबत कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली आहे.

नांदगाव पेठ पोलिसांच्या तातडीच्या तपासामुळे जबरी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लागला असून, चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास नांदगाव पेठ पोलीस करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button