नागपुरात मध्यरात्री पेट्रोल पंपावर चाकू हल्ला

पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या तीन तरुणांपैकी एकाचा मशीन ऑपरेटरवर वार; हल्ल्यानंतर तिघेही पसार
नागपूर | सीताबर्डी
नागपुरातील सीताबर्डी परिसरात मध्यरात्री पेट्रोल पंपावर घडलेल्या चाकू हल्ल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या तीन अनोळखी तरुणांपैकी एकाने मशीन ऑपरेटरवर अचानक चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात मशीन ऑपरेटरच्या डाव्या पायाच्या मागील बाजूस दुखापत झाली असून, हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
ही घटना २ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे २ वाजून १० मिनिटांनी आरबीआय चौकातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर घडली. त्यावेळी मशीन ऑपरेटर लोकेश कडव हे नेहमीप्रमाणे ड्युटीवर होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निळ्या रंगाच्या मोपेडवरून तीन अनोळखी तरुण पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आले. यातील अंदाजे २५ वर्षांच्या एका तरुणाने अचानक गाडीवरून खाली उतरत लोकेश कडव यांच्या जवळ जाऊन हातातील चाकूने त्यांच्या डाव्या पायाच्या मागील बाजूस वार केला.
विशेष म्हणजे, हा हल्ला करण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कोणताही वाद किंवा कारण नसताना आरोपीने अचानक हल्ला केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. हल्ल्यानंतर आरोपी आपल्या दोन साथीदारांसह काहीही न बोलता तिथून पसार झाले.
अचानक झालेल्या चाकू हल्ल्यामुळे पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जखमी मशीन ऑपरेटरने या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून तपास सुरू केला आहे.
या प्रकरणातील तीनही अनोळखी आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर उपलब्ध माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुहास मधुकर राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मध्यरात्री पेट्रोल पंपावर घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे सीताबर्डी परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्नही पुन्हा ऐरणीवर आला आहे.



