Latest NewsMaharashtraWashim

पावसाने साथ सोडली, कर्जमाफीचा लाभही नाही; ८५ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या

कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील अल्पभूधारक शेतकरी आनंदराव खाडे यांच्या मृत्यूने शेतकरी संकटाचे गंभीर वास्तव समोर

वाशिम | कारंजा

वाशिमच्या कारंजा तालुक्यात शेतकरी संकटाचे गंभीर चित्र समोर आले आहे. कामरगाव येथील ८५ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी आनंदराव राजारामजी खाडे यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पावसाने दिलेली दडी, सिंचनाचा अभाव आणि पिकांचे झालेले नुकसान, तसेच शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळाल्याने ते चिंतेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

आनंदराव खाडे यांची शेती टाकळी बुद्रुक शिवारात असून, पाण्याअभावी त्यांच्या सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. सोयाबीनचे पीक डोळ्यादेखत वाळत असल्याने आणि कर्जाचा प्रश्न कायम असल्याने ते मानसिक तणावात असल्याची माहिती कुटुंबीयांकडून समोर आली आहे.

शुक्रवारी सायंकाळी ग्रामीण रुग्णालय परिसरात त्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे टाकळी बुद्रुक आणि कामरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एका वयोवृद्ध अल्पभूधारक शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्याने पिकांचे नुकसान, सिंचनाची उपलब्धता आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या शासकीय मदतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पावसाच्या खंडामुळे सोयाबीनसह खरीप पिकांना मोठा फटका बसला असताना, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत आणि कर्जमाफीचा लाभ वेळेत मिळतोय का, हा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाला आहे. आनंदराव खाडे यांच्या आत्महत्येची नेमकी कारणे आणि त्यामागील परिस्थितीबाबत पोलीस तपास सुरू असून, तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

या दुःखद घटनेने खाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन शेतकरी कुटुंबाला आवश्यक मदत आणि आधार द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button