citynewslatestnewss politicalnewsNandedpolitics

नांदेड विमानतळावर मराठा तरुणांची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यानंतर विरोध तीव्र; शिंदे साहेब वापस जा, अशा घोषणा

नांदेड : परभणी येथे आयोजित करण्यात आलेला शेतकरी मेळावा रद्द करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिल्यानंतर नांदेडमध्ये मराठा समाजाचा विरोध तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेड विमानतळावर येणार असल्याची माहिती मिळताच मराठा तरुण मोठ्या संख्येने विमानतळ परिसरात दाखल झाले. यावेळी आंदोलकांनी शिंदे साहेब वापस जा, अशा घोषणा देत आपला विरोध व्यक्त केला. अचानक मोठ्या संख्येने तरुण विमानतळ परिसरात जमा झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी विमानतळ परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून आंदोलकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले.

मनोज जरांगे पाटील यांनी परभणीतील नियोजित शेतकरी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सरकारला इशारा दिल्यानंतर मराठा समाजामध्ये या कार्यक्रमाबाबत नाराजी व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या नांदेड दौऱ्यावेळी मराठा तरुणांनी विमानतळावर एकत्र येत घोषणाबाजी केली.

दरम्यान, परभणी येथे शेतकरी मेळावा आयोजित केल्यास खासदार बंडू जाधव यांनाही मराठा तरुणांनी इशारा दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे परभणीतील नियोजित मेळाव्यावरून आता नांदेडसह मराठवाड्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विमानतळ परिसरातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था केली असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. परभणीतील शेतकरी मेळावा नियोजित वेळापत्रकानुसार होणार की रद्द केला जाणार, तसेच मराठा समाजाच्या वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून कोणती भूमिका घेतली जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button