citynewsMaharashtraThane

ठाणे वर्षा मॅरेथॉनमध्ये गोंधळ; शाळकरी विद्यार्थ्यांचे महापौरांसमोर ठिय्या आंदोलन

मेडल, प्रमाणपत्र आणि नाश्ता न मिळाल्याच्या तक्रारी; मोठ्या स्पर्धकांनीही महापालिका कार्यालय गाठले

ठाणे : ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या ३२ व्या वर्षा मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या शाळकरी विद्यार्थ्यांनी थेट महापौरांसमोरच ठिय्या आंदोलन केल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊनही काही विद्यार्थ्यांना मेडल आणि प्रमाणपत्र मिळाले, तर काही विद्यार्थ्यांना ते मिळाले नसल्याची तक्रार करण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी मुख्य स्टेजसमोरच आंदोलन सुरू केले.

मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी काहींना मेडल देण्यात आल्याचे, तर काहींना मेडल आणि प्रमाणपत्रापासून वंचित ठेवण्यात आल्याचे सांगितले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. आंदोलनादरम्यान महापौरांसमोर विद्यार्थ्यांनी आपल्या तक्रारी मांडल्या. तसेच विविध शाळांमधील सहभागी विद्यार्थ्यांचे शिक्षक आणि प्रतिनिधींनी समोर येऊन या प्रकरणाची माहिती द्यावी, अशी विनंतीही करण्यात आली.

दरम्यान, मॅरेथॉनमध्ये पैसे भरून सहभागी झालेल्या मोठ्या स्पर्धकांनीही आयोजनातील सुविधांबाबत नाराजी व्यक्त केली. मॅरेथॉन पूर्ण करूनही काही स्पर्धकांना मेडल आणि नाश्ता मिळाला नसल्याची तक्रार करण्यात आली. अपेक्षित सुविधा उपलब्ध न झाल्याने संतप्त झालेल्या स्पर्धकांनी थेट महापालिकेच्या मॅरेथॉन कार्यालयाकडे धाव घेतली.

काही किलोमीटरचे अंतर पूर्ण करूनही सहभागी स्पर्धकांना मूलभूत सुविधा मिळाल्या नसल्याचा आरोप करण्यात आला. मेडल आणि नाश्त्याच्या मागणीसाठी काही स्पर्धकांनी महापालिकेच्या मुख्य मॅरेथॉन कक्षाबाहेर ठिय्या आंदोलन केले.

शाळकरी विद्यार्थी आणि मोठे स्पर्धक अशा दोन्ही गटांकडून तक्रारी समोर आल्याने ३२ व्या वर्षा मॅरेथॉनच्या आयोजन आणि व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सहभागींसाठी मेडल, प्रमाणपत्र आणि नाश्त्याची व्यवस्था नेमकी कशी करण्यात आली होती आणि काही स्पर्धकांना या सुविधा का मिळाल्या नाहीत, याबाबत आयोजक व महापालिका प्रशासनाकडून स्पष्टीकरण अपेक्षित आहे.

या तक्रारींची महापालिका प्रशासन आणि मॅरेथॉनचे आयोजक कशी दखल घेतात आणि सहभागी स्पर्धकांच्या समस्यांचे निराकरण कसे केले जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button