अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; नागपुरात करिअर मार्गदर्शन सोहळा

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी मोफत JEE-NEET Advanced क्लासेसचा मानस; डॉ. सुरज लोखंडे यांच्या MDS शिक्षणासाठी अडीच लाखांची मदत
नागपूर : साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त नागपुरात गुणवंत विद्यार्थी सत्कार, करिअर मार्गदर्शन आणि पालकांची जबाबदारी या विषयावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सम्राट प्रसेनजित सामाजिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर आणि लहुजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शंकर नगर चौक येथील श्री साई सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला विद्यार्थी तसेच पालकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन देवेंद्र काटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अण्णाभाऊ साठे यांचे नातू तथा डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन साठे, दिल्ली येथील JNU विद्यापीठाचे डॉ. प्रा. मिलिंद आव्हाड आणि डॉ. आशिष तायवाडे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेच्या माध्यमातून इंग्लिश स्पिकिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, स्पर्धा परीक्षा तसेच पोलीस भरतीचे मोफत वर्ग सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी भविष्यात JEE आणि NEET Advanced चे मोफत प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करताना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आवश्यक मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्यात आले.
या कार्यक्रमातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे प्रसिद्ध उद्योजक संजय सोनटक्के यांनी डॉ. सुरज लोखंडे यांच्या MDS शिक्षणासाठी अडीच लाख रुपयांची आर्थिक मदत केली. या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाला न्यायाधीश सुधीर वानखेडे, उद्योजक संजय सोनटक्के, सहकार अधिकारी गजानन सनेसर, बँक अधिकारी प्रशांत अवसरे, प्रवीण ढोके आणि पोलीस निरीक्षक महादेव खंडारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता ताकतोडे यांनी केले. प्रास्ताविक प्रभाकर शिंदे यांनी केले, तर आभार सचिन तेलंगे यांनी मानले.
अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक समतेच्या आणि शैक्षणिक प्रगतीच्या विचारांना अभिवादन करत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि करिअरला दिशा देणारा ठरला.




