citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur graminNagpurPolice

रामटेकमध्ये बिबट्याचा ११ वर्षीय मुलावर हल्ला; चिमुकला गंभीर जखमी

भिलेवाडा येथील वीटभट्टीवर खेळत असताना बिबट्याची झडप; जखमी मुलावर नागपूरच्या मेयो रुग्णालयात उपचार सुरू

रामटेक (अजय मेहरकुळे, सिटी न्यूज) : नागपूर जिल्ह्यातील रामटेक पवनी वनपरिक्षेत्रांतर्गत भोंदेवाडा बीटमधील भिलेवाडा परिसरात बिबट्याने एका ११ वर्षीय मुलावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (२८ नोव्हेंबर) दुपारी सुमारे ४ वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात उमेश अशोक धनवार (वय अंदाजे ११ वर्षे, मूळ रा. छत्तीसगड) हा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नागपूर येथील मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आजी आंघोळीसाठी गेली अन् बिबट्याची झडप

मिळालेल्या माहितीनुसार, भिलेवाडा परिसरातील चौकसे यांच्या वीटभट्टीवर छत्तीसगडमधील मजूर वीट तयार करण्याचे काम करतात. शनिवारी दुपारी उमेशची आजी भागीरथी धनवार या आंघोळीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी उमेश वीटभट्टीजवळच खेळत होता.

याचदरम्यान शेत परिसरातून आलेल्या बिबट्याने अचानक उमेशवर झडप घातली. बिबट्याच्या हल्ल्यामुळे मुलाने आरडाओरड सुरू केली. आवाज ऐकताच आजीने त्याला वाचविण्यासाठी धाव घेतली. त्यांनी दगड आणि विटा मारून बिबट्याला पिटाळून लावले. त्यानंतर बिबट्याने मुलाला सोडून घटनास्थळावरून पळ काढला.

वनविभागाकडून तातडीने मदत; मेयो रुग्णालयात उपचार

घटनेची माहिती वीटभट्टी मालक चौकसे यांना मिळताच त्यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी उमेशला पुढील उपचारासाठी नागपूर येथील मेयो रुग्णालयात दाखल केले.

बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक वनसंरक्षक गोविंदा लुचे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.

दरम्यान, परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी विशेषतः अंधाराच्या वेळी एकटे बाहेर जाणे टाळावे, सतर्क राहावे आणि स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

सिटी न्यूज प्रतिनिधी अजय मेहरकुळे, रामटेक

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button