citynewsNagpur

नरेंद्रनगर चौकात भक्तिमय वातावरणात दहीहंडी उत्सव

डीजे आणि अश्लील गाण्यांना फाटा; भजन-भक्तिगीतांच्या तालावर लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

नागपूर : नरेंद्रनगर चौकात यंदाचा दहीहंडी उत्सव भक्ती, संस्कृती आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला. जन्माष्टमी मित्रपरिवार, श्रीनगर सुयोग नगर आणि सुंदरबन नागरिक कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रतीकात्मक दहीहंडी फोडून उत्सवाची सुरुवात करण्यात आली.

प्रभाग क्रमांक ३५ च्या नगरसेविका विशाखा मोहोड यांच्या विशेष प्रयत्नातून आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवात भारतीय संस्कृती आणि कौटुंबिक परंपरांना विशेष महत्त्व देण्यात आले. विशेष म्हणजे यंदाच्या उत्सवात डीजे तसेच अश्लील गाण्यांना पूर्णपणे फाटा देण्यात आला. त्याऐवजी भजन, भक्तिगीते आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्सव साजरा करण्यात आला.

उत्सवाची सुरुवात सामूहिक हनुमान चालीसा पठणाने करण्यात आली. त्यानंतर भव्य गंगा महाआरतीचे आयोजन करण्यात आले. युवकांसाठी विशेष भजन रॉक बँड आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भक्तिमय संगीताच्या तालावर उपस्थितांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

डीजे आणि अश्लीलतामुक्त वातावरणामुळे या उत्सवाला विशेष स्वरूप प्राप्त झाले. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत संपूर्ण कुटुंबाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून दहीहंडीचा आनंद घेतला. युवकांचा उत्साह आणि भक्तिमय वातावरण यांचा सुरेख संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला.

डीजे नाही, अश्लीलता नाही; तर भक्ती, संस्कृती आणि युवकांचा जोश या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडी उत्सवाला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पारंपरिक सण आधुनिक पद्धतीने साजरा करताना सामाजिक आणि कौटुंबिक वातावरण जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

यावेळी माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भक्ती, संस्कृती आणि कौटुंबिक वातावरणाला प्राधान्य देत साजरा झालेला नरेंद्रनगर चौकातील दहीहंडी उत्सव यंदा नागपूरकरांसाठी विशेष आकर्षण ठरला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button