महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; नाशिकसह ७ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

जळगाव, नाशिकसह मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून काहीसा ओसरलेला पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने राज्यातील ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला असून, या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जळगाव, नाशिक, जालना, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड या सात जिल्ह्यांमध्ये आज काही ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत जोरदार वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवर हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी हवामानाच्या अपडेटकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, पश्चिम बंगाल आणि बांग्लादेश परिसरातील हवामान प्रणालीचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावर होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांत पुन्हा पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर कमी झाल्याने अनेक भागांत उकाडा वाढला होता. वातावरणातील बदलांमुळे पावसाच्या वितरणातही चढ-उतार पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत राज्यातील विविध भागांत पावसाची स्थिती कशी राहते, याकडे नागरिक आणि शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
येलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होत असताना मोकळ्या जागेत जाणे टाळावे आणि सुरक्षित ठिकाणी राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



