Chhatrapati Sambhaji NagarcitynewsCrime NewsLatest NewsMaharashtraMaharashtraCrime

संभाजीनगरमध्ये शाळेत चाकू हल्ला; दहावीच्या विद्यार्थ्याने ४ वर्गमित्रांना भोसकले

धक्का दिल्याच्या किरकोळ वादातून हल्ला; चार विद्यार्थी जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगाव रंगारी येथील एका नामांकित शाळेत धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ वादातून दहावीच्या एका विद्यार्थ्याने आपल्या चार वर्गमित्रांवर पॉकेट चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात चार विद्यार्थी जखमी झाले असून, त्यापैकी एका विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मधल्या सुट्टीदरम्यान विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये धक्का दिल्याच्या कारणावरून वाद झाला. सुरुवातीला किरकोळ स्वरूपाचा असलेला हा वाद काही वेळातच वाढला.

वादादरम्यान संतप्त झालेल्या दहावीतील विद्यार्थ्याने संबंधित विद्यार्थ्यांना धमकावल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर काही समजण्याच्या आतच त्याने जवळ असलेल्या पॉकेट चाकूने चार वर्गमित्रांवर वार केले.

या हल्ल्यात दोन विद्यार्थ्यांच्या दंडावर, एका विद्यार्थ्याच्या पायावर, तर आणखी एका विद्यार्थ्याच्या पाठीवर चाकूचे वार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर शाळेच्या परिसरात एकच खळबळ उडाली.

जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट चाकू हल्ल्यात झाल्याने पालक आणि नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. शाळेत चाकू कसा आला, हल्ल्याचे नेमके कारण काय होते आणि या घटनेबाबत शाळा प्रशासन व पोलिसांकडून कोणती कारवाई करण्यात येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या घटनेबाबत अधिकृत तपासातून समोर येणारी माहिती महत्त्वाची ठरणार असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दाही पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button