AmravatiAmravatiMahanagarpalikaAmravatiMunicipalCorporationcitynewsLatest NewsMaharashtra

कोरोनानंतर पुन्हा दहीहंडीचा जल्लोष; ५ सप्टेंबरला राजकमल चौकात ‘गोविंदा आला रे आला’

नवयुवक विद्यार्थी संघटनेचा सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांना पुन्हा प्रारंभ; दहीहंडीपासून नव्या पर्वाची सुरुवात

अमरावती | प्रतिनिधी

कोरोना महामारीनंतर खंड पडलेले सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय नवयुवक विद्यार्थी संघटनेने घेतला असून, त्याची सुरुवात यंदा भव्य दहीहंडी उत्सवाने होणार आहे. शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी अमरावतीतील राजकमल चौक येथे ‘गोविंदा आला रे आला’ या दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे.

नवयुवक विद्यार्थी संघटनेतर्फे अनेक वर्षांपासून राजकमल चौक परिसरात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत होते. मात्र, कोरोना काळात या उपक्रमांना खंड पडला होता. आता पुन्हा एकदा ही परंपरा सुरू करण्याचा निर्धार संघटनेने केला असून, दहीहंडी उत्सव हा त्याचा पहिला टप्पा ठरणार आहे.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, अमरावतीमध्ये मुंबईनंतर दहीहंडी उत्सवाची परंपरा सुरू करण्याचे श्रेय नवयुवक विद्यार्थी संघटनेला जाते. आता संघटनेत नव्या पिढीचा उत्साहपूर्ण सहभाग वाढत असल्याने पुन्हा एकदा हा पारंपरिक उत्सव मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संघटनेच्या माहितीनुसार, दहीहंडी उत्सवानंतरही वर्षभर विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नवरात्रोत्सवादरम्यान अल्प दरात साबुदाणा खिचडी व पुरीचे स्टॉल, सार्वजनिक कोजागिरी उत्सव, गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्षाचे स्वागत, तसेच ईद मिलन यांसारखे विविध कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.

राजकमल चौकात होणाऱ्या या उपक्रमांना अमरावतीकर नागरिकांचा नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे संघटनेने नमूद केले. तसेच या कार्यक्रमांना प्रसिद्धी मिळवून देण्यात पत्रकार बांधवांचेही महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कोरोनानंतर सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा पुन्हा जोमाने सुरू करण्याच्या दिशेने नवयुवक विद्यार्थी संघटनेने उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. आगामी ५ सप्टेंबर रोजी राजकमल चौकात होणाऱ्या दहीहंडी उत्सवाकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button