हिंगणघाटमध्ये पावसाअभावी शेतकरी संकटात! तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी

सोयाबीन, कापूस आणि तुरीचे नुकसान झाल्याचा काँग्रेसचा दावा; प्रति हेक्टरी ८० हजार रुपयांची मदत देण्याची मागणी, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा
वर्धा | हिंगणघाट
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात यंदा पावसाअभावी शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याचे चित्र आहे. जून महिन्यापासून अपेक्षित पाऊस न झाल्याने सोयाबीन, कापूस आणि तूर या प्रमुख पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर हिंगणघाट तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
हिंगणघाट तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागीय अधिकारी, हिंगणघाट यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ८० हजार रुपये मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
पेरणी आणि शेतीच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले. मात्र, पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्याने उत्पादनावर परिणाम झाला असून, आता घेतलेले कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.
त्यामुळे शासनाने तातडीने पीक नुकसानीचे सर्वेक्षण करून पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
हिंगणघाट तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासह शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या मागणीवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मांडली. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काँग्रेसकडून देण्यात आला आहे.
यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष श्रीराम साखरकर, माजी तालुका अध्यक्ष प्रमोद भाऊ महाजन यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, पावसाअभावी संकटात सापडलेल्या हिंगणघाट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे प्रत्यक्ष सर्वेक्षण कधी होणार आणि शासनाकडून मदतीबाबत काय निर्णय घेतला जाणार, याकडे आता शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सिटी न्यूजसाठी विशेष रिपोर्ट.



