धावड्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन! गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचा शाल-श्रीफळ देऊन सन्मान

दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची उत्साहात सांगता; हजारो हिंदू-मुस्लिम बांधव मिरवणुकीत सहभागी, पोलिसांच्या चोख बंदोबस्तात विसर्जन सोहळा शांततेत पार
भोकरदन | धावडा
भोकरदन तालुक्यातील धावडा येथे दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता उत्साह, भक्तिभाव आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात झाली. गणपती विसर्जन मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश पाहायला मिळाला. विशेष म्हणजे मुस्लिम बांधवांनी गणेश मंडळांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला.
दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी धावडा येथे भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
यावेळी प्रतिष्ठित व्यापारी मुख्तार सेट पठाण यांच्या वतीने गणेश मंडळांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या उपक्रमातून धार्मिक सणाच्या निमित्ताने परस्परांचा सन्मान, बंधुभाव आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला.
गणेश विसर्जन मिरवणुकीत हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकमेकांचा सन्मान करत सामाजिक सलोख्याची परंपरा कायम ठेवली. धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येत नागरिकांनी परस्पर सन्मान आणि बंधुभावाचे दर्शन घडवले.
मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पारध पोलिसांकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक सचिन खामगळ यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पडली.
या मिरवणुकीत हजारो हिंदू-मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. भक्तीच्या उत्साहासोबतच धार्मिक सलोखा, परस्पर सन्मान आणि सामाजिक एकतेचा संदेश देत धावड्यातील गणेश विसर्जन सोहळ्याची सांगता झाली.
सिटी न्यूजसाठी विशेष रिपोर्ट.



