agriculturecitynewsLatest NewsMaharashtraMaharashtra PoliticsNandedpolitics

लोह्यात शेतकऱ्याची व्यथा ऐकून डोळ्यात आले अश्रू! सुनेत्रा पवारांसमोर शेतकऱ्याचा भावनिक आक्रोश

एकरी ५० हजार खर्च करूनही उत्पन्न नाही; अतिवृष्टी आणि यंदाच्या पावसाच्या खंडामुळे पिकांचे नुकसान झाल्याची शेतकऱ्याची व्यथा

नांदेड | लोहा

नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शेती पिकांची पाहणी केली. यावेळी एका शेतकऱ्याने आपली व्यथा मांडताना भावनिक होत थेट उपमुख्यमंत्र्यांसमोरच अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

लोहा परिसरातील शेती पिकांची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्या होत्या. यावेळी आनंदा पवार या शेतकऱ्याने आपल्या शेतीची परिस्थिती आणि झालेल्या नुकसानीची माहिती त्यांच्यासमोर मांडली.

आपली व्यथा सांगताना आनंदा पवार भावुक झाले आणि बोलता बोलता त्यांना अश्रू अनावर झाले. एकरी तब्बल ५० हजार रुपये खर्च करूनही हातात काहीच उत्पन्न आले नसल्याची व्यथा त्यांनी मांडली.

मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण जमीन खरडून गेली. त्यानंतर यंदाच्या पावसाच्या खंडामुळे आणि कोरड्या परिस्थितीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शेतीवर केलेला खर्चही निघत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्याची ही व्यथा सांगताना त्यांचा बांधावरच भावनिक बांध फुटला. यावेळी त्यांनी दादा असते तर अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली नसती, अशी खंत व्यक्त केली.

उपमुख्यमंत्र्यांसमोरच शेतकऱ्याने अशा प्रकारे आपल्या व्यथा मांडल्याने उपस्थितांचेही लक्ष या परिस्थितीकडे वेधले गेले. गेल्या दोन हंगामांतील नैसर्गिक संकटांमुळे शेतीचे झालेले नुकसान, वाढलेला उत्पादन खर्च आणि हातात न पडणारे उत्पन्न, या सगळ्याचा ताण शेतकऱ्याच्या अश्रूंमधून स्पष्टपणे दिसून आला.

आता आनंदा पवार यांनी मांडलेली ही व्यथा आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रश्न शासनापर्यंत किती प्रभावीपणे पोहोचतो आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कोणती मदत मिळते, याकडे लोहा परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सिटी न्यूजसाठी विशेष रिपोर्ट.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button