Accident NewsAccidentNewsAmravatiAmravatiCorporationAmravatiMunicipalCorporationcitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत भीषण अपघात; राजापेठ उड्डाणपुलावर रेतीच्या ट्रकच्या धडकेत दोन तरुणींचा मृत्यू

हेल्मेट घालूनही जीव वाचला नाही; ट्रक चालक फरार, वाहतूक सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर मंगळवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणींचा दुर्दैवी मृत्यू झाला. रेतीने भरलेल्या भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत गौरी प्रमोद धर्माळे आणि हर्षा आदेश गावंडे या दोन्ही तरुणींचा मृत्यू झाला असून, कामानिमित्त अमरावतीत आलेल्या या दोघींना काळाने रस्त्यातच गाठले.

प्राथमिक माहितीनुसार, एमएच-२७-ईबी-९५८७ क्रमांकाची दुचाकी राजापेठ उड्डाणपुलावरून जात असताना पुढे रेतीने भरलेला ट्रक होता. त्याचवेळी ट्रक आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की एका तरुणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या तरुणीचा रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, मृत तरुणींनी हेल्मेट परिधान केले होते. मात्र, धडकेचा जोर इतका प्रचंड होता की हेल्मेटचे तुकडे झाले आणि त्यांचाही जीव वाचू शकला नाही. या घटनेने परिसरातील नागरिक हादरले.

अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण आणि त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. चालक फरार झाल्याने पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणला. फरार चालकाचा शोध सुरू असून, त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

या भीषण अपघातामुळे राजापेठ उड्डाणपुलावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वाहतूक पोलिसांनी तातडीने पर्यायी मार्गाने वाहतूक वळवून परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान, शहरातील नो-एन्ट्रीच्या वेळेत अवजड वाहनांची वर्दळ, वाढती वाहतूक, रस्त्यांवरील खड्डे, अतिक्रमण आणि वाहतूक व्यवस्थेतील त्रुटींमुळे अशा अपघातांच्या घटना वारंवार घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अशा अवजड वाहनांवर कठोर नियंत्रण आणण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.

या अपघातात नेमकी चूक कोणाची होती, ट्रकचा वेग किती होता, वाहतूक नियमांचे उल्लंघन झाले होते का आणि अपघातास कारणीभूत परिस्थिती नेमकी काय होती, याचा सखोल तपास राजापेठ पोलीस करीत आहेत.

राजापेठ उड्डाणपुलावरील या दुर्घटनेने दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शहरातील रस्ते सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. अपघातासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कोणती कारवाई होते आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button