AmravaticitynewsCrime NewsLatest NewsMaharashtraMaharashtraCrime

अमरावतीत अवैध वरली मटका व जुगार अड्ड्यांवर गुन्हेशाखेची धडक कारवाई; 28 आरोपी ताब्यात

शहरातील पाच ठिकाणी एकाच वेळी छापेमारी; ₹2.41 लाखांचा मुद्देमाल जप्त, साऊर गावातील कारवाईत 22 जण रंगेहाथ पकडले

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती शहरात अवैध वरली मटका आणि जुगार व्यवसायाविरोधात गुन्हेशाखेने मोठी धडक कारवाई करत एकाच दिवशी शहरातील पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत एकूण 28 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून ₹2 लाख 41 हजार 740 रुपयांचा रोख रक्कम आणि जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार 27 जुलै 2026 रोजी गुन्हेशाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे शहरातील विविध भागांमध्ये एकाच वेळी कारवाई केली. अवैध वरली मटका आणि जुगार अड्ड्यांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये आरोपींकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या मोहिमेतील सर्वात मोठी कारवाई वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साऊर गावात करण्यात आली. एका शेतातील गोठ्यात ‘एक्का बादशहा’ नावाचा हारजीतचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. घटनास्थळी जुगार चालविणारे आणि खेळणारे असे एकूण 22 जण आढळून आले. या कारवाईत तब्बल ₹2 लाख 33 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याशिवाय फेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन स्वतंत्र ठिकाणी छापे टाकून सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेले जुगार अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. या कारवाईत रोख रक्कम आणि जुगार साहित्य जप्त करून संबंधित आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.

गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिद्धार्थ नगर, नवसारी परिसरातही जुगार अड्ड्यावर छापा टाकून आरोपीकडून रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त करण्यात आले. तसेच नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अकबर नगर परिसरातही पोलिसांनी कारवाई करत एका आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा नोंदविला.

पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर शहरात सुरू असलेल्या अवैध वरली मटका आणि जुगार व्यवसायाविरोधातील ही मोठी कारवाई मानली जात आहे. अशा अवैध धंद्यांवर आगामी काळातही सातत्याने धडक मोहिमा राबविण्यात येणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

अमरावती शहरात अवैध जुगार आणि वरली मटका व्यवसायाविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे बेकायदेशीर धंदे चालविणाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाला असून, शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहतील, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button