अमरावती पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; 377 हरवलेले मोबाईल शोधून मालकांना परत, ₹65.63 लाखांचा मुद्देमाल हस्तांतरित

CEIR पोर्टल आणि सायबर पोलिसांच्या तांत्रिक तपासामुळे यश; महाराष्ट्रासह परराज्यातूनही मोबाईल हस्तगत
अमरावती | प्रतिनिधी
अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाने हरवलेले, गहाळ किंवा चोरीला गेलेले मोबाईल शोधून काढण्याच्या मोहिमेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. सन 2026 मध्ये प्राप्त झालेल्या तक्रारींवर कारवाई करत सायबर पोलीस स्टेशन आणि शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलच्या साहाय्याने तब्बल 377 मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात दिले. या मोबाईलची एकूण अंदाजित किंमत ₹65 लाख 63 हजार 800 इतकी आहे.
अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाकडे हरवलेले, गहाळ किंवा चोरीला गेलेल्या मोबाईलबाबत दाखल झालेल्या तक्रारींचा सखोल तांत्रिक तपास करण्यात आला. CEIR पोर्टलच्या मदतीने हे मोबाईल केवळ अमरावती जिल्ह्यातूनच नव्हे, तर महाराष्ट्रातील विविध जिल्हे आणि परराज्यातूनही शोधून काढण्यात पोलिसांना यश आले.
28 जुलै 2026 रोजी अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात हे सर्व मोबाईल संबंधित तक्रारदारांना परत सुपूर्द करण्यात आले. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने अनेक नागरिकांनी अमरावती पोलिसांचे आभार मानत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
ही मोहीम पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, श्याम घुगे आणि प्रांजली सोनवणे तसेच सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली.
सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत कासार आणि शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या सायबर पथकांनी तांत्रिक विश्लेषण, समन्वय आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या जोरावर ही यशस्वी मोहीम पूर्ण केली.
यावेळी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की, मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी आणि CEIR प्रणालीचा लाभ घ्यावा. तसेच कोणत्याही प्रकारच्या ऑनलाइन आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्ह्याच्या घटनेत त्वरित राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930 वर संपर्क साधावा.
अमरावती पोलिसांच्या या कारवाईमुळे आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रभावी तपासाच्या साहाय्याने हरवलेले मोबाईल परत मिळू शकतात, हा विश्वास नागरिकांमध्ये अधिक दृढ झाला आहे.



