मराठवाड्यात शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; बियाणे उगवले नाही, उगवलेल्या पिकावर गोगलगायींचा प्रादुर्भाव

दुबार पेरणीचा वाढता खर्च; नुकसानभरपाई आणि तातडीच्या मदतीची शेतकऱ्यांची मागणी
धाराशिव/लातूर | प्रतिनिधी
मराठवाड्यात उशिराने झालेल्या पावसानंतर मोठ्या आशेने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर आता दुहेरी संकट ओढवले आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनची बियाणे उगवली नसल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. तर ज्या शेतांमध्ये पीक उगवले आहे, तेथे गोगलगायींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई आणि तातडीच्या मदतीची मागणी केली आहे.
धाराशिव, लातूर आणि परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी पावसानंतर सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र काही दिवस उलटूनही अनेक शेतांमध्ये बियाण्यांची उगवण झाली नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कर्ज काढून खरेदी केलेले बियाणे निष्फळ ठरल्याने आता पुन्हा बियाणे, खते आणि मशागतीवर खर्च करावा लागत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे.
दरम्यान, कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या माहितीनुसार काही विशिष्ट लॉटमधील बियाण्यांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. संबंधित कंपनीने काही प्रकरणांमध्ये नवीन बियाणे देण्याची तयारी दर्शविली असली, तरी शेतकरी आर्थिक नुकसानभरपाईची मागणी करीत आहेत.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यात बियाण्यांच्या उगवणीबाबत आतापर्यंत ४२ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी २५ तक्रारी महाबीजच्या बियाण्यांशी संबंधित आहेत. संबंधित शेतांमध्ये पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रांसह लेखी तक्रार सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याचबरोबर लातूर, धाराशिव आणि परिसरातील काही भागांत उगवलेल्या पिकांवर गोगलगायींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. नव्याने उगवलेली रोपे गोगलगायी खात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान आणखी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने पंचनामे करून प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी केली आहे.
दरम्यान, बियाण्यांच्या उगवणीतील समस्या आणि गोगलगायींच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले असून शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



