कामरगाव येथे अप्पर तहसील कार्यालयाच्या मागणीसाठी भव्य मोर्चा; सर्वपक्षीय एकजूट

कारंजा तहसील कार्यालयावर नागरिकांचे शक्तीप्रदर्शन; कामरगावलाच अप्पर तहसीलचा दर्जा देण्याची मागणी
वाशीम | प्रतिनिधी
वाशीम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात अप्पर तहसील कार्यालयाच्या मागणीवरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. कामरगाव येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याच्या मागणीसाठी रविवारी नागरिक, व्यापारी, शेतकरी आणि सर्वपक्षीय नेते मोठ्या संख्येने एकत्र आले. या मागणीसाठी कारंजा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
कामरगाव हे परिसरातील प्रमुख बाजारपेठांपैकी एक असून तीन ते चार महसूल मंडळांसाठी महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जाते. भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती स्थान, वाढती लोकसंख्या आणि उपलब्ध शासकीय सुविधा लक्षात घेता अप्पर तहसील कार्यालय कामरगाव येथेच स्थापन करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
दरम्यान, धनज बुद्रुक येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचीही मागणी होत आहे. मात्र, धनज बुद्रुक हे मुख्य मार्गापासून आत असल्याने परिसरातील नागरिकांना महसुली कामांसाठी ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागेल, असा दावा आंदोलनकर्त्यांनी केला.
या पार्श्वभूमीवर कामरगाव तालुका कृती समितीच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, शेतकरी तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र आले. गावातील राजकीय मतभेद बाजूला ठेवत सर्वांनी एकमुखाने कामरगावलाच अप्पर तहसील कार्यालयाचा दर्जा देण्याची मागणी केली.
१३ जुलै रोजी कारंजा तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. मोर्चानंतर प्रशासनाला निवेदन सादर करून मागणीचा गांभीर्याने विचार करण्याची विनंती करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, अप्पर तहसील कार्यालय कामरगाव येथे सुरू झाल्यास परिसरातील शेकडो गावांतील नागरिकांना महसुली कामांसाठी मोठा दिलासा मिळेल. तसेच कारंजा येथे वारंवार फेऱ्या मारण्याची गरज कमी होऊन वेळ आणि आर्थिक खर्चाची बचत होईल.
कामरगावच्या मागणीसाठी सर्वपक्षीय पातळीवर झालेली ही एकजूट लक्षवेधी ठरली असून, आता या मागणीवर राज्य सरकार आणि महसूल प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे संपूर्ण वाशीम जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



