राज्यात पावसाची अचानक विश्रांती; २० जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

सुरुवातीच्या मुसळधार पावसानंतर कोरडे वातावरण; शेतकऱ्यांची चिंता वाढली, काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट
मुंबई | प्रतिनिधी
जुलै महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रात मुसळधार पावसाने अनेक भागांना झोडपून काढल्यानंतर आता मान्सूनचा जोर अचानक कमी झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतली असून ऊन आणि कोरडे वातावरण कायम आहे. या बदललेल्या परिस्थितीमुळे शेतीपिकांच्या वाढीबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली असून हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठीही मर्यादित पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, ९ जुलैनंतर राज्यातील पावसाचा जोर कमी झाला. सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनला बळ देणारी कोणतीही प्रभावी हवामान प्रणाली सक्रिय नसल्याने महाराष्ट्रात व्यापक पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झालेली नाही. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागांत ढगांची निर्मिती कमी होत असून पुढील चार ते पाच दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
१२ आणि १३ जुलै रोजी राज्यातील बहुतांश भागांसाठी ग्रीन अलर्ट देण्यात आला असून, व्यापक पावसाची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
१४ जुलै रोजी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर १५ आणि १६ जुलै रोजी नागपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर या विदर्भातील जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पडू शकतात, तर इतर जिल्ह्यांमध्ये तुरळक स्वरूपाचा हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि राज्यातील इतर अनेक भागांमध्ये पावसाअभावी शेतीपिकांवरील संकट अधिक गडद झाले आहे. दुबार पेरणीची शक्यता, उगवलेल्या पिकांच्या वाढीवरील परिणाम आणि जमिनीतील ओलावा कमी होणे, या समस्यांमुळे शेतकरी चिंतेत आहेत.
हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार २० जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. मात्र, तोपर्यंत राज्यातील बहुतांश भागांत ढगाळ वातावरण आणि तुरळक सरींचीच शक्यता असून, व्यापक स्वरूपाचा पाऊस होण्यासाठी नागरिक आणि शेतकऱ्यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते.



