Accident NewscitynewsLatest NewsMaharashtraPune

जेजुरीजवळ वारकऱ्यांवर भरधाव ट्रक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, अनेक जखमी

बेलसर टोलनाक्याजवळ भीषण अपघात; ट्रक चालकावरील नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज

जेजुरी | प्रतिनिधी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सासवड-जेजुरी मार्गावरील बेलसर टोलनाक्याजवळ सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला, तर चारहून अधिक महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या. पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या वारकऱ्यांवर भरधाव ट्रक घुसल्याने हा अपघात घडला. या घटनेमुळे वारकरी संप्रदायासह संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, वारीसाठी अन्नधान्य आणि साहित्य घेऊन जाणारा ट्रक अचानक अनियंत्रित झाला आणि रस्त्याने पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या दिशेने घुसला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.

या दुर्घटनेत तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून चारहून अधिक महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना तातडीने जेजुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, मृत महिला वारकरी या सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

दरम्यान, पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालकाचे वय सुमारे ७० वर्षे असून त्याने सकाळी तापाची गोळी घेतली होती. त्यानंतर त्याला अचानक ग्लानी आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या दाव्याची अधिकृत पुष्टी तपासानंतरच होणार आहे.

घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.

अपघातानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयात जाऊन जखमी वारकऱ्यांची भेट घेतली. त्यांनी जखमींची विचारपूस करत मृत आणि जखमी वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

आषाढी वारीसारख्या पवित्र यात्रेदरम्यान घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे वारकऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. अपघाताचे नेमके कारण पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार असून जखमींच्या प्रकृतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button