AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत लोंबकळणाऱ्या फायबर केबलचा धोका; राजकमल उड्डाणपुलावर दुचाकी अडकून महिला जखमी

रस्त्यावर आलेल्या ऑप्टिकल फायबरमध्ये दुचाकी अडकली; महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार, धोकादायक केबल्सवर कारवाईचे मनपाचे आश्वासन

अमरावती : अमरावती शहरात इंटरनेट आणि केबल टीव्ही सेवेसाठी टाकण्यात आलेल्या ऑप्टिकल फायबर केबल्सच्या बेशिस्त जाळ्यामुळे आता नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील चौक, विद्युत पोल, रस्त्यांच्या कडेला आणि उड्डाणपुलांवर अनेक ठिकाणी फायबर केबल्स अक्षरशः लोंबकळताना दिसत आहेत. याच लोंबकळणाऱ्या फायबर केबलमुळे एका महिलेचा अपघात झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे.

सोमवार, ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास राजकमल उड्डाणपुलावर हा अपघात झाला. राजापेठकडून इर्विनच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर इलेक्ट्रिक पोलवरून लटकणारी फायबर केबल रेलिंगच्या बाहेर येऊन थेट रस्त्यावर आली होती.

याच मार्गावरून MH 27 CH 9389 क्रमांकाच्या दुचाकीवरून एक महिला जात असताना ही फायबर केबल दुचाकीला अडकली. अचानक केबल अडकल्याने दुचाकीचा तोल गेला आणि महिला वाहनासह रस्त्यावर पडल्या. या दुर्घटनेत महिलेला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर शहरातील धोकादायक फायबर केबल्सचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विविध चौक, रस्त्यांच्या कडेला असलेले विद्युत पोल आणि उड्डाणपुलांवर मोठ्या प्रमाणात केबल्स लटकताना किंवा रस्त्याच्या दिशेने आलेल्या दिसत आहेत. त्यामुळे एखादी केबल अचानक तुटून खाली पडल्यास किंवा वाहनाला अडकल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे, राजकमल उड्डाणपुलावरील धोकादायक ऑप्टिकल फायबर केबल्सवर यापूर्वीही महापालिकेने कारवाई केली होती. अपघाताची शक्यता लक्षात घेऊन काही केबल्स कापण्यात आल्या होत्या आणि संबंधित केबल ऑपरेटरनाही सूचना देण्यात आल्या होत्या.

मात्र त्यानंतरही पुन्हा फायबर केबल रस्त्यावर आल्याने महापालिकेच्या कारवाईचा आणि केबल ऑपरेटरच्या जबाबदारीचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

राजकमल उड्डाणपुलासह इरविन चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरही काही ठिकाणी केबल्स डिव्हायडर आणि रेलिंगच्या बाहेर आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एका महिलेच्या अपघातानंतरही या धोकादायक केबल्स तातडीने हटवण्यात आल्या नाहीत, तर भविष्यात आणखी गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्या शहरात मांज्यामुळे होणाऱ्या अपघातांचा धोका चर्चेत असतानाच, लोंबकळणाऱ्या फायबर केबल्सदेखील नागरिकांसाठी तितक्याच धोकादायक ठरत असल्याचे या घटनेने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, महापालिका प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, अपघाताची शक्यता असलेल्या ठिकाणच्या धोकादायक ऑप्टिकल फायबर केबल्सवर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मात्र ही कारवाई प्रत्यक्षात कधी सुरू होते आणि शहरातील धोकादायक फायबरचे जाळे केव्हा हटवले जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

इंटरनेट आणि केबल सेवा देण्यासाठी टाकण्यात आलेल्या या केबल्सचे योग्य व्यवस्थापन, देखभाल आणि सुरक्षित पद्धतीने वायरिंग करणे ही संबंधित ऑपरेटरची जबाबदारी असताना, सार्वजनिक रस्त्यांवर आणि उड्डाणपुलांवर नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने केबल्स लोंबकळत राहणे कितपत योग्य, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

एका महिलेच्या अपघातानंतर तरी प्रशासनाने जागे होऊन धोकादायक फायबर केबल्सवर तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे. कारण हा प्रश्न आता केवळ इंटरनेट किंवा केबल सेवेचा राहिलेला नसून, थेट नागरिकांच्या जीवित सुरक्षेशी जोडला गेला आहे.

मांज्याचा धोका असो किंवा रस्त्यावर लोंबकळणाऱ्या फायबरचा… नागरिकांच्या सुरक्षेसाठी या दोन्ही धोक्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची गरज आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button