परतवाड्यात माऊली मल्टीस्टेट सोसायटीच्या ठेवीदारांचा पैशांसाठी हेलपाटा!

१०० हून अधिक ठेवीदारांच्या रकमा अडचणीत; पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी, संचालकांकडून लवकर रक्कम देण्याचे आश्वासन
परतवाडा : अमरावती जिल्ह्यात मुथूट फिनकॉर्प प्रकरणानंतर ग्राहकांच्या आर्थिक सुरक्षिततेचा मुद्दा चर्चेत असतानाच परतवाड्यातील माऊली मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या ठेवीदारांच्या पैशांबाबत तक्रारी समोर आल्या आहेत. जयस्तंभ चौकातील या संस्थेत १०० हून अधिक ठेवीदारांनी आपली रक्कम ठेवल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र, ठेवीतील रक्कम किंवा बचत खात्यातील पैसे काढण्यासाठी ग्राहक शाखेत गेल्यानंतर त्यांना अपेक्षित रक्कम मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे ठेवीदारांना आपल्या पैशांसाठी वारंवार संस्थेच्या शाखेत हेलपाटे मारावे लागत असल्याचे सांगितले जात आहे.
काही ग्राहकांना धनादेश देण्यात आले असल्याचेही समोर आले आहे. मात्र, या धनादेशांच्या माध्यमातून रक्कम नेमकी कधी मिळणार, याबाबत स्पष्ट तारीख सांगण्यात आली नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. त्यामुळे फिक्स डिपॉझिट आणि बचत खात्यातील पैसे कधी मिळणार, हा प्रश्न ठेवीदारांसमोर उभा राहिला आहे.
दरम्यान, ग्राहकांच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर संस्थेचे अध्यक्ष सरोदे यांनी लवकरच रक्कम प्राप्त होणार असल्याचे आश्वासन देणारा व्हिडिओ पाठविल्याची माहिती आहे. त्यामुळे ठेवीदारांना लवकरच दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मात्र, सध्या तरी ग्राहकांना त्यांच्या रकमेबाबत स्पष्ट आणि ठोस माहिती मिळणे गरजेचे आहे. संस्थेकडून पैसे देण्यास विलंब का होत आहे, ठेवीदारांच्या रकमेची सद्यस्थिती काय आहे आणि सर्व ग्राहकांना पैसे कधीपर्यंत मिळणार, याबाबत संस्थेने स्पष्ट भूमिका मांडणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे, या प्रकरणी अद्याप पोलीस तक्रार दाखल झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रकरणाची पुढील दिशा काय असेल, याकडे ठेवीदारांचे लक्ष लागले आहे.
मुथूट फिनकॉर्प प्रकरणानंतर आर्थिक संस्थांमधील ठेवीदारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर असतानाच आता परतवाड्यातील या तक्रारींमुळे ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे.
ठेवीदारांचे कष्टाचे पैसे नेमके कधी परत मिळणार आणि संस्थेकडून याबाबत ठोस वेळापत्रक जाहीर केले जाणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



