Accident NewscitynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur graminNagpurPolice

चौघानजवळ विटांनी भरलेला ट्रक झाडावर आदळला; आठ जण गंभीर जखमी

अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर तीन जेसीबीच्या मदतीने बचावकार्य; जखमींना नागपूर मेडिकलमध्ये हलवले

रामटेक : रामटेक तालुक्यातील चौघान परिसरात विटांनी भरलेला ट्रक झाडावर आदळून भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत ट्रकमध्ये प्रवास करणारे तब्बल आठ जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर सर्वजण ट्रकच्या केबिनमध्ये अडकले होते. तब्बल अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर तीन जेसीबीच्या मदतीने सर्व आठ जणांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले.

मिळालेल्या माहितीनुसार, चौघान येथील सोना ब्रिक्स येथून MH 40 CT 9476 क्रमांकाचा ट्रक विटा भरून मनसर अमराईच्या दिशेने जात होता. ट्रकमध्ये चालक मतेंद्र राजकुमार नेवारे यांच्यासह दिशा मतेंद्र नेवारे, हंसाबाई राजकुमार नेवारे, दोन वर्षांचा हर्ष नेवारे, सुरज पैकरा, पृथ्वी पैकरा, अभिजित पैकरा आणि मुकेश पैकरा असे आठ जण प्रवास करत होते.

चौघान वळणाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळला. ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात विटा भरलेल्या असल्याने धडकेनंतर केबिनचा भाग मोठ्या प्रमाणात दबला आणि त्यामध्ये बसलेले सर्वजण अडकले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, ठाणेदार राजेशकुमार थोरात आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले.

तीन जेसीबीच्या मदतीने तब्बल अडीच तास प्रयत्न केल्यानंतर सर्व आठही जखमींना ट्रकमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिकांच्या माध्यमातून सर्व जखमींना रामटेक उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले.

दरम्यान, या अपघातानंतर रामटेक उपजिल्हा रुग्णालयातील आपत्कालीन वैद्यकीय सुविधांचा मुद्दाही चर्चेत आला आहे. रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आल्याचे सांगण्यात येत आहे. तर १०८ रुग्णवाहिकेत व्हेंटिलेटर उपलब्ध असतानाही त्याच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

याशिवाय बंद असलेल्या व्हेंटिलेटरचे फोटो आणि व्हिडिओ घेत असताना पत्रकारांना मनाई करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे रामटेक उपजिल्हा रुग्णालयातील आपत्कालीन सुविधांबाबत प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

या भीषण अपघातात सुदैवाने आठही जखमींना अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात यश आले. मात्र अपघाताची नेमकी कारणे आणि रुग्णालयातील आपत्कालीन सुविधांबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांचा रामटेक पोलिसांकडून तसेच प्रशासनाकडून तपास होणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अपघाताचा पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button