वाशिममध्ये ST च्या NCMC कार्डचा पहिल्याच दिवशी गोंधळ; मशीनमध्ये एरर, महिलांना पूर्ण तिकीटाचा भुर्दंड!

सवलतीच्या प्रवाशांसाठी NCMC कार्ड अनिवार्य; तांत्रिक बिघाडामुळे अर्ध्या तिकिटाऐवजी पूर्ण तिकीट, प्रवाशांमध्ये नाराजी
वाशिम : राज्य परिवहन महामंडळाच्या NCMC कार्ड व्यवस्थेचा वाशिममध्ये पहिल्याच दिवशी गोंधळ उडाल्याचा आरोप होत आहे. सवलतीच्या प्रवाशांसाठी आजपासून NCMC कार्डद्वारे तिकीट काढणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र बसमधील तिकीट मशीनमध्ये तांत्रिक अडचणी आणि एरर येत असल्याने महिला प्रवाशांना अर्ध्या तिकिटाऐवजी चक्क पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागत असल्याचे समोर आले आहे.
राज्य परिवहन महामंडळाकडून महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवासाची, तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सवलत दिली जाते. या सवलतींचा लाभ घेण्यासाठी आता NCMC म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.
मात्र वाशिममध्ये या योजनेच्या अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणींचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. प्रवासादरम्यान तिकीट मशीनमध्ये NCMC कार्ड स्कॅन करताना एरर येत असल्याने महिलांना सवलतीचा लाभ न मिळता पूर्ण तिकीट काढावे लागत आहे.
याशिवाय काही महिला प्रवाशांच्या NCMC कार्डमध्ये रिचार्ज होत नसल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. त्यामुळे सवलतीचा लाभ मिळावा म्हणून कार्ड घेतलेल्या प्रवाशांनाच आता आर्थिक आणि तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पहिल्याच दिवशी कार्ड आणि तिकीट मशीनमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने NCMC व्यवस्थेच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सवलतीसाठी पात्र असतानाही पूर्ण तिकीट काढावे लागत असल्याने महिलांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, NCMC कार्ड आणि तिकीट मशीनमधील तांत्रिक त्रुटी तातडीने दूर कराव्यात, तसेच सवलतीच्या प्रवाशांना कोणताही अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू नये, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
आता एसटी महामंडळ या तांत्रिक अडचणींवर किती लवकर तोडगा काढते आणि महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या सवलतीचा लाभ सुरळीतपणे कधीपासून मिळतो, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.



