रामटेक गड मंदिर ट्रस्ट विधेयकावरून नवा वाद; स्थानिकांकडून प्रश्न उपस्थित

श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट विधेयक २०२६ मंजूर; ट्रस्ट स्थापनेच्या प्रक्रियेवर आणि सदस्यत्वाच्या अटींवर आक्षेप
रामटेक | प्रतिनिधी
रामटेक येथील ऐतिहासिक गड मंदिराच्या व्यवस्थापनासंदर्भात मंजूर झालेल्या श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट विधेयक २०२६ वरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. विधेयकाला विधानमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटत असतानाच आता काही स्थानिक नागरिक आणि संबंधित व्यक्तींनीही विविध मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
गड मंदिराचे ट्रस्टमध्ये रूपांतर व्हावे यासाठी मागील चार वर्षांपासून कायदेशीर पाठपुरावा करणारे तक्रारदार राहुल कोठेकर यांनी विधेयकाच्या वेळेबाबत आणि प्रक्रियेबाबत आक्षेप नोंदवले आहेत.
कोठेकर यांच्या म्हणण्यानुसार, धर्मादाय आयुक्तांनी १५ जून रोजी ट्रस्ट स्थापनेसंदर्भात नोटीस जारी केल्यानंतरच हे विधेयक का आणण्यात आले, असा प्रश्न उपस्थित होतो. तसेच विद्यमान राज्यमंत्री आणि गेली २५ वर्षे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे ॲड. आशिष जयस्वाल यांनी यापूर्वी हा निर्णय का घेतला नाही, असाही सवाल त्यांनी केला आहे.
दरम्यान, ट्रस्टच्या सदस्यत्वासाठी ‘श्रीराम भक्त असल्याचे शपथपत्र’ सादर करण्याच्या अटीवरही काही स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशा प्रकारची अट सर्वसमावेशकतेच्या दृष्टीने योग्य आहे का, याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
मात्र, या आक्षेपांवर शासन किंवा संबंधित ट्रस्टकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान, श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट विधेयकावरून सुरू झालेल्या चर्चेमुळे रामटेकमध्ये विविध स्तरांवर मतमतांतरे व्यक्त होत असून या विषयावर शासनाची पुढील भूमिका आणि संभाव्य स्पष्टीकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



