पावसाची प्रतीक्षा अन् शेतकऱ्यांची वाढती चिंता! हळदीचे बियाणे अजूनही घरातच

शेत तयार, बेड तयार… पण पावसाअभावी लागवड खोळंबली; मेहकर तालुक्यातील शेतकऱ्याची व्यथा
बुलढाणा | प्रतिनिधी
जून महिना संपत आला तरीही अनेक भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खंडाळा येथील एका शेतकऱ्याने हळद लागवडीसाठी शेत तयार करून ठेवले आहे, मात्र पावसाअभावी बियाणे अजूनही घरातच पडून आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खंडाळा येथील शेतकरी दत्तात्रय मानघाले यांनी हळद लागवडीसाठी शेताची संपूर्ण मशागत पूर्ण केली आहे. शेतात बेड तयार करण्यात आले असून लागवडीची सर्व तयारीही पूर्ण झाली आहे. मात्र, अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने हळदीचे बियाणे घरातच पडून आहे.
पावसाअभावी लागवड खोळंबल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यामध्ये आणखी गंभीर बाब म्हणजे शेतीसाठी आधार असलेली विहीरही आता साथ देत नसल्याचे चित्र आहे.
सुमारे 60 फूट खोल असलेल्या विहिरीतील पाणी तब्बल 50 फूट खोलवर गेले असून उपलब्ध पाणी शेतीसाठी अपुरे पडत आहे. त्यामुळे हळद लागवड तर दूरच, इतर पिकांनाही पाणी देणे कठीण झाले आहे.
भूजल पातळी घटल्याने आणि पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक आणि मानसिक संकट उभे ठाकले आहे. वेळेत पेरणी आणि लागवड न झाल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शेतीसाठी मोठा खर्च करूनही निसर्गाची साथ मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तयार केलेले बेड कोरडे पडू लागल्याने चिंता अधिकच वाढली आहे.
आता दमदार पावसाची प्रतीक्षा करत शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. शेतकरी दत्तात्रय मानघाले यांनी लवकरात लवकर चांगला पाऊस पडावा, जेणेकरून हळदीची लागवड करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
सध्या बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांतील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून, पावसाची प्रत्येक चाहूल आशेचा किरण ठरत आहे.
एकीकडे शेतीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे, तर दुसरीकडे पावसाअभावी शेतकरी हतबल झाले आहेत. आता सर्वांच्या नजरा मान्सूनकडे लागल्या असून लवकरच दमदार पाऊस पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



