प्रवीण पोटेंची विजयाची हॅट्ट्रिक! अमरावती विधान परिषदेत भाजपचा दणदणीत विजय

390 मतांची विक्रमी कमाई; काँग्रेस उमेदवाराला एकही मत नाही, भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
अमरावती | प्रतिनिधी
अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी दणदणीत विजय मिळवत सलग विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. नियोजन भवन येथे पार पडलेल्या मतमोजणीत प्रवीण पोटे यांना तब्बल 390 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांना एकही मत मिळाले नाही. विजयाची अधिकृत घोषणा होताच भाजप कार्यकर्त्यांनी मिठाई वाटप आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष साजरा केला.
22 जून रोजी अमरावतीतील नियोजन भवन येथे विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी पार पडली. मतमोजणीच्या सुरुवातीला वैध आणि अवैध मतांची छाननी करण्यात आली.
एकूण 427 मतांपैकी 421 मते वैध तर 6 मते अवैध ठरली. विजयासाठी 211 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता.
मतपत्रिकांची मोजणी सुरू होताच भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांना तब्बल 390 मते मिळाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पहिल्याच फेरीत त्यांचा विजय निश्चित झाला.
या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना 31 मते मिळाली. तर काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांना एकही मत मिळवता आले नाही. त्यामुळे काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशीष येरेकर यांनी प्रवीण पोटे यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली आणि त्यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान केले.
दरम्यान, मतमोजणीपूर्वीच नियोजन भवन परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
प्रवीण पोटे यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत मिठाई वाटली. महापौर, भाजप पदाधिकारी, नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून प्रवीण पोटे यांचे अभिनंदन केले.
शहरभर अभिनंदनाचे बॅनर झळकू लागले असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या विजयामुळे प्रवीण पोटे यांनी विधान परिषदेत सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅट्ट्रिकची नोंद केली असून अमरावतीतील भाजपचे राजकीय वर्चस्व आणखी मजबूत झाल्याचे मानले जात आहे.



