गोदावरीत रेती माफियांवर पोलिसांचा ब्लास्ट! 2.90 कोटींच्या 14 बोटी जागीच उडवल्या

मुदखेड पोलिसांची धडक कारवाई; अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांविरोधात मोठा दणका
नांदेड | प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील मुदखेड पोलिसांनी अवैध रेती उत्खननाविरोधात मोठी धडक कारवाई करत रेती माफियांना जबरदस्त दणका दिला आहे. गोदावरी नदीपात्रातून अवैधरीत्या रेती उपसा करणाऱ्यांविरोधात छापा टाकत पोलिसांनी 11 फायबर बोटी आणि 3 इंजिन बोटी जप्त केल्या. तब्बल 2 कोटी 90 लाख रुपयांचा मुद्देमाल जिलेटीनच्या सहाय्याने जागीच नष्ट करण्यात आला. या कारवाईमुळे अवैध रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अवैध रेती उत्खनन आणि चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर मुदखेड पोलिसांनी ही विशेष मोहीम राबवली.
20 जून 2026 रोजी पोलीस निरीक्षक धिरज दत्तात्रय चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. गोदावरी नदीच्या पात्रात काही इसम फायबर आणि इंजिन बोटींच्या सहाय्याने अवैधरित्या रेतीचा उपसा करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ माळकौठा शिवारातील गोदावरी नदीपात्रात छापा टाकला. यावेळी काही संशयित आरोपी बोटींच्या सहाय्याने रेती चोरी करत असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बोटीच्या सहाय्याने पाठलाग सुरू केला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपी फायबर आणि इंजिन बोटी नदीपात्रातच सोडून घटनास्थळावरून फरार झाले.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी 11 फायबर बोटी आणि 3 इंजिन बोटी असा एकूण 2 कोटी 90 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
नदीपात्रातून हा अवजड मुद्देमाल बाहेर काढणे शक्य नसल्याने तसेच पर्यावरण आणि सुरक्षेची काळजी घेत पोलिसांनी जिलेटीनच्या सहाय्याने सर्व बोटी जागीच ब्लास्ट करून नष्ट केल्या.
या प्रकरणी गणेश पाटील उबाळे, भरत ढगे, कचरू जाधव उर्फ पप्पू मिस्त्री, कामाजी भरकडे, माधव सोमवारे, ज्ञानेश्वर कळसे, बबन खानसोळे यांच्यासह दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ प्रकाश सुनकूमवार करीत आहेत.
या धाडसी आणि प्रभावी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी मुदखेड पोलीस पथकाचे विशेष कौतुक केले आहे.
गोदावरी नदीपात्रातील अवैध रेती उत्खननाविरोधात मुदखेड पोलिसांनी केलेली ही कारवाई रेती माफियांना मोठा इशारा मानली जात आहे. अवैध उत्खनन रोखण्यासाठी पोलीस प्रशासन आणखी कठोर कारवाई करणार असल्याचे संकेत या मोहिमेतून मिळत आहेत.



