तोंडगाव टोलवर बनावट नोटांचा भांडाफोड! पान टपरी चालकाच्या सतर्कतेने 10 लाखांच्या नकली नोटा जप्त; राजस्थानचा आरोपी अटकेत

वाशिम जिल्ह्यात बनावट नोटांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून तोंडगाव टोल नाक्यावर नकली नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल 10 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे एका पान टपरी चालकाच्या जागरूकतेमुळे आणि टोल कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे हा संपूर्ण कट उघडकीस आला.
माहितीनुसार, राजस्थानमधील काही संशयित व्यक्ती वाशिम बायपासवरील एका पान टपरीवर पोहोचले. त्यांनी खरेदी करताना 500 रुपयांची बनावट नोट दिली. नोट संशयास्पद वाटल्याने पान टपरी चालकाने तात्काळ सावध भूमिका घेत ही माहिती तोंडगाव टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना दिली.
काही वेळानंतर संशयितांची राजस्थान पासिंगची स्कॉर्पिओ टोल नाक्यावर आली. यावेळी फास्टटॅग बंद असल्याचे सांगत त्यांनी पुन्हा एकदा 500 रुपयांची बनावट नोट देण्याचा प्रयत्न केला. मात्र टोल नाका व्यवस्थापक रवि गोटे यांनी तत्परता दाखवत वाहन मागे घेण्यास सांगितले आणि संशयितांना तेथेच थांबवून ठेवले. त्याचवेळी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. यामध्ये एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले, तर त्याचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेत पसार होण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी स्कॉर्पिओ वाहनाची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचा साठा आढळून आला. तपासादरम्यान तब्बल 10 लाख रुपयांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या.
विशेष म्हणजे गेल्या आठ दिवसांत वाशिम जिल्ह्यात बनावट नोटांविरोधातील ही दुसरी मोठी कारवाई ठरली आहे. यापूर्वीही पोलिसांनी 25 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करून एका आरोपीला अटक केली होती. त्यामुळे जिल्ह्यात बनावट चलनाचे मोठे नेटवर्क कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू असून या बनावट नोटा कुठून आणल्या गेल्या, त्यांचा पुरवठा कोण करत होते आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा सखोल तपास सुरू आहे.
पान टपरी चालकाची जागरूकता आणि टोल कर्मचाऱ्यांची तत्परता यामुळे बनावट नोटांचा मोठा कट उधळून लावण्यात यश आले आहे. मात्र जिल्ह्यात वारंवार समोर येणाऱ्या अशा घटनांमुळे बनावट चलनाच्या वाढत्या नेटवर्कबाबत चिंता व्यक्त केली जात असून या प्रकरणातील पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



