AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

लग्नाला गेले अन् घर फोडले! तळेगाव दशासरमध्ये जवळपास 4 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

अमरावती : जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी घरफोडी उघडकीस आली असून अज्ञात चोरट्यांनी जवळपास चार लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घराचे मुख्य कुलूप सुरक्षित असतानाही खिडकीतून प्रवेश करून ही चोरी करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मांजरखेड दानापूर येथील रहिवासी विमल वामणराव ठाकरे आणि त्यांचे पती हे एका लग्नसमारंभासाठी वर्धा जिल्ह्यातील धोंडगाव येथे गेले होते. घराची देखरेख करण्यासाठी त्यांनी शेजारी राहणाऱ्या नातेवाईकाला घराच्या पोर्चमध्ये झोपण्यास सांगितले होते.

मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी घरी परतल्यानंतर घरातील कपाट उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कपाटाची तपासणी केली असता त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे उघड झाले.

चोरीस गेलेल्या ऐवजात सोन्याचे कानातले, अंगठी, पोत, नेकलेस आणि सोन्याच्या बांगड्यांचा समावेश असून एकूण 117 ग्रॅम 680 मिलिग्रॅम वजनाचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. या दागिन्यांची अंदाजे किंमत 3 लाख 92 हजार 62 रुपये इतकी असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

घटनास्थळी पाहणी केल्यानंतर घराच्या कुलरजवळील खिडकी उघडी आढळून आली. त्यामुळे अज्ञात चोरट्यांनी याच मार्गाने घरात प्रवेश करून चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणी तळेगाव दशासर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयितांची माहिती आणि स्थानिकांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी जवळपास चार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या धाडसी घरफोडीमागील आरोपींपर्यंत पोलीस किती लवकर पोहोचतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button