citynewsJalnaLatest NewsMaharashtra

पावसाळा उंबरठ्यावर, तरीही जालना तहानलेला! 48 गावे, 31 वाड्यांचा टँकरवर जीव; 1.32 लाख नागरिकांची पाण्यासाठी परवड

जालना : राज्यात मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागली असतानाही जालना जिल्ह्यात पाणीटंचाईचे भीषण वास्तव कायम आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत असून प्रशासनाकडून टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.

प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार, सध्या जालना जिल्ह्यातील 48 गावे आणि 31 वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यासाठी दररोज 79 टँकरच्या माध्यमातून सुमारे 154 खेपा करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 32 हजार नागरिकांची तहान सध्या टँकरच्या पाण्यावर भागवली जात असल्याचे वास्तव समोर आले आहे.

जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात पाणीटंचाईची सर्वाधिक दाहकता जाणवत आहे. अनेक गावांमध्ये विहिरी, बोअरवेल आणि पारंपरिक जलस्रोत कोरडे पडल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

बदनापूर तालुक्यातील चिखली गावात आजही नागरिक घरासमोर टाक्या, ड्रम आणि पाण्याची भांडी ठेवून टँकरची वाट पाहताना दिसत आहेत. टँकर आल्यानंतर पाणी भरण्यासाठी महिलांची आणि नागरिकांची मोठी गर्दी होत असून अनेकांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या या भागात यंदाही परिस्थितीत फारसा बदल झालेला दिसत नाही. भर पावसाळ्याच्या तोंडावरही नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याने प्रशासनाच्या दीर्घकालीन जलव्यवस्थापनाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, प्रशासनाकडून टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा सुरू असल्याचा दावा करण्यात येत असला तरी अनेक गावांमधील नागरिकांनी कायमस्वरूपी जलस्रोत निर्माण करण्याची आणि पाणीटंचाईवर शाश्वत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

मान्सून काही दिवसांवर येऊन ठेपला असला तरी जालना जिल्ह्यातील हजारो नागरिकांसाठी पाण्याचा प्रत्येक थेंब आजही अमूल्य ठरत आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या या भागाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button