‘विकसित भारत 2047’साठी कौशल्यसंपन्न युवकांची गरज; एआय, सेमीकंडक्टर आणि नवतंत्रज्ञानावर भर – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : विकसित भारत 2047चे स्वप्न साकार करण्यासाठी कौशल्यसंपन्न, तंत्रज्ञानसज्ज आणि जागतिक स्पर्धेला सामोरे जाणारे मानव संसाधन तयार करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी केले. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सेमीकंडक्टर आणि क्वांटम कॉम्प्युटिंग यांसारख्या नवतंत्रज्ञानामुळे रोजगार क्षेत्राचे स्वरूप झपाट्याने बदलत असून युवकांना आधुनिक कौशल्यांनी सक्षम करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईतील Taj President Hotel येथे आयोजित वाय4डी (Youth for Development) च्या ‘India @ 2047 – Power of Skill and Education’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी Shivendrasinhraje Bhosale, युथ फॉर डेव्हलपमेंटचे अध्यक्ष Praful Nikam तसेच विविध उद्योग समूहांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, Narendra Modi यांच्या नेतृत्वाखाली भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशातील 25 कोटी नागरिक अतिदारिद्र्यातून बाहेर आले असून पायाभूत सुविधा, स्वच्छता, निवास आणि रोजगाराच्या संधींमुळे सर्वसमावेशक विकासाला गती मिळाली आहे.
महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कौशल्य विकासाला विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील युवकांची मोठी लोकसंख्या ही देशाची ताकद असून या लोकसंख्यात्मक लाभाचे आर्थिक शक्तीत रूपांतर करण्यासाठी गुणवत्तापूर्ण कौशल्य प्रशिक्षण आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी राज्य शासनाने ‘महाविस्तार’ हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲप विकसित केल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. या ॲपद्वारे शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापन, हवामान, कीड नियंत्रण आणि सिंचनाबाबत विविध भाषांमध्ये मार्गदर्शन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढील हजार दिवसांत सुमारे 70 टक्के रोजगारांचे स्वरूप बदलण्याची शक्यता असल्याचे नमूद करत त्यांनी शासन, उद्योग क्षेत्र आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे काम करून युवकांना भविष्यातील रोजगारांसाठी तयार करण्याचे आवाहन केले.
कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांद्वारे जलसुरक्षा, आरोग्य, शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रात प्रभावी काम होत असल्याचे सांगत त्यांनी वाय4डी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. सामंजस्य करारांपेक्षा प्रत्यक्ष कामाचा समाजावर झालेला परिणाम मोजून ‘इम्पॅक्ट रिपोर्ट’ सादर करण्याची संकल्पना अभिनव असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान विविध उद्योग समूहांच्या सामंजस्य करारांमुळे झालेल्या सामाजिक परिणामांच्या अहवालांचे प्रकाशन करण्यात आले. समाजपरिवर्तनाच्या कार्यात योगदान देणाऱ्या उद्योग समूहांचे आणि वाय4डी संस्थेचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन केले.
विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना शिक्षण, कौशल्य विकास आणि तंत्रज्ञान यांचा संगम घडवून युवकांना सक्षम बनविणे हेच भविष्यातील यशाचे प्रमुख सूत्र ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.



