बकरी ईदपूर्वी अमरावतीत मोठी कारवाई; २४० हून अधिक गोवंशांचे प्राण वाचवणाऱ्या अधिकारी सचिन बोंद्रे यांचा भाजयुमोकडून सत्कार

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात अवैध गोवंश वाहतूक आणि कत्तलीविरोधात प्रशासनाने मोठी कारवाई करत तब्बल २४० हून अधिक गोवंशांचे प्राण वाचवले आहेत. या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणारे अमरावती महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी सचिन बोंद्रे यांचा भाजयुमोकडून भव्य सत्कार करण्यात आला.
गेल्या ८ ते १० दिवसांपासून अमरावती महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने पोलिस प्रशासनाच्या मदतीने विशेष मोहीम राबवली होती. या मोहिमेदरम्यान कत्तलखान्यांकडे नेण्यात येणारे तसेच अवैधरित्या डांबून ठेवलेले २४० हून अधिक गोवंश मुक्त करण्यात आले. या बेजुबान जनावरांचे प्राण वाचवण्यात पशुवैद्यकीय अधिकारी सचिन बोंद्रे आणि त्यांच्या पथकाची महत्त्वाची भूमिका राहिली.
त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारतीय जनता युवा मोर्चा अर्थात भाजयुमो अमरावती शहर जिल्ह्याच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. भाजयुमो पदाधिकारी महानगरपालिका कार्यालयात पोहोचले आणि पुष्पगुच्छ देत सचिन बोंद्रे यांचा सार्वजनिक सन्मान केला. यावेळी भाजयुमो आणि भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी भाजयुमो शहर जिल्हाध्यक्ष विकी उर्फ विजय शर्मा यांनी महाराष्ट्र सरकारच्या गोवंश हत्या बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल मनपा आणि पोलिस प्रशासनाचे कौतुक केले. गेल्या काही दिवसांत प्रशासनाने दाखवलेली तत्परता अत्यंत कौतुकास्पद असून भविष्यातही अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरू राहावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, भाजयुमोच्या वतीने मनपा प्रशासन आणि पोलिस विभागाचे आभारही व्यक्त करण्यात आले. अवैध गोवंश वाहतूक आणि कत्तलीविरोधात प्रशासनाने उचललेल्या कठोर पावलांमुळे शहरात समाधान व्यक्त केले जात असून आगामी काळातही अशा मोहिमा अधिक प्रभावीपणे राबवल्या जातील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



