मेळघाटातील धारणी तालुक्यात ईद उत्साहात साजरी; हिंदू-मुस्लिम ऐक्याचा पुन्हा उमटला संदेश

मेळघाटातील धारणी तालुक्यात आज ईदचा सण मोठ्या उत्साहात, आनंदात आणि शांततेत साजरा करण्यात आला. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारणी तालुक्यात मुस्लिम समाज बांधवांनी नमाज अदा करत एकतेचा आणि बंधुभावाचा संदेश दिला.
धारणी शहरासह बैरागड, कुसुमकोट बुजुर्ग, कलमखार, रोणीखेडा, सुसर्दा आणि राणीगाव या भागांमध्ये ईदचा सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच मशिदींमध्ये मुस्लिम समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत नमाज अदा केली.
ईदच्या निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा देत बंधुभाव आणि सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश देण्यात आला. धारणी तालुका हा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून संपूर्ण जिल्ह्यात ओळखला जातो. यावर्षीदेखील ईदच्या सणादरम्यान सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र पाहायला मिळाले.
यावेळी माजी आमदार राजकुमार पटेल, नगरसेवक राजा खान, नगरसेवक पंकज मोरे, शोएब मेमन आणि मलीक शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. माजी आमदार राजकुमार पटेल यांनी सर्व नागरिकांना ईदच्या शुभेच्छा देत हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश दिला.
संपूर्ण धारणी तालुक्यात ईदच्या निमित्ताने आनंद, उत्साह आणि शांततेचे वातावरण पाहायला मिळाले. सण कोणताही असो, सामाजिक ऐक्य आणि बंधुभाव जपणे हीच खरी परंपरा असल्याचा संदेश धारणी तालुक्याने पुन्हा एकदा दिला आहे.



