कामरगाव ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; ७२ वर्षीय दिव्यांग वृद्ध दीड वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत

वाशिम जिल्ह्यातील कामरगाव ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे एका ७२ वर्षीय दिव्यांग वृद्धाला गेल्या दीड वर्षांपासून न्यायासाठी ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट आहे.
कामरगाव येथील ७२ वर्षीय दिव्यांग वृद्ध श्रीकृष्ण अर्जुन किर्दक हे आपल्या हक्काच्या जागेच्या मोजणीसाठी गेल्या दीड वर्षांपासून शासकीय कार्यालयांचे हेलपाटे मारत आहेत.
नमुना ८-अ मध्ये अधिकृत नोंद असतानाही त्यांच्या जागेवर गावातीलच एका व्यक्तीने कथितरित्या बेकायदेशीर बांधकाम सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत वारंवार लेखी तक्रारी आणि स्मरणपत्रे देऊनही ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे.
स्थानिक स्तरावर न्याय मिळत नसल्याने अखेर हे प्रकरण पंचायत समितीकडे पोहोचले. यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी ३१ जानेवारी २०२५ रोजी जागेची तात्काळ शासकीय मोजणी करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते.
मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशालाही ग्रामपंचायतीने कथितपणे केराची टोपली दाखवल्याचा आरोप होत आहे. पीडित वृद्ध आदेशाची प्रत घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता त्यांना “आम्ही मोजणी देणार नाही, न्यायालयात जा” असे उत्तर देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, गावातील नागरिकांनीही ग्रामपंचायतीविरोधात विविध तक्रारी केल्या असून प्रशासन मात्र कारवाई करत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
अखेर पीडित वृद्धाने जिल्हा परिषद वाशिमचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. न्याय न मिळाल्यास ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
एका दिव्यांग वृद्धाला आपल्या हक्कासाठी दीड वर्षांपासून संघर्ष करावा लागत असल्याचा आरोप होत असताना आता जिल्हा प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते आणि संबंधितांवर कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



