अमरावती विधानपरिषद निवडणुकीत डॉ. गणेश खारकर यांच्या उमेदवारीची चर्चा; राजकीय समीकरणांना वेग

अमरावतीच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन नेतृत्वाचा मजबूत चेहरा म्हणून ओळखले जाणारे डॉ. गणेश खारकर यांनी निवडणूक लढण्याचा जोरदार निर्धार व्यक्त केला आहे. महायुतीकडून अद्याप उमेदवाराची घोषणा न झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला असून अमरावतीच्या राजकारणात नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद अमरावती शहर जिल्ह्याच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकातून ही माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि समता परिषदेचे प्रदेश सचिव डॉ. गणेश खारकर हे मंत्री छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय मानले जातात.
स्थानिक ओबीसी चळवळीतील पदाधिकारी आणि बहुजन समाजातील विविध घटकांनी डॉ. खारकर यांनी विधानपरिषद निवडणूक लढवावी असा जोरदार आग्रह धरल्याचे सांगितले जात आहे. फुले-शाहू-आंबेडकरी विचारसरणीशी जोडलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना सक्रिय नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.
भिडे वाडा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित रथाच्या स्वागतावेळी झालेल्या भव्य कार्यक्रमात डॉ. खारकर यांच्या नेतृत्वाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. अमरावती शहर आणि ग्रामीण भागात त्यांनी उभा केलेला कार्यकर्ता वर्ग त्यांच्या राजकीय ताकदीचे प्रतीक मानला जात आहे.
महानगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर त्यांचा व्यापक जनसंपर्क असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत नवे राजकीय समीकरण तयार होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, डॉ. गणेश खारकर यांच्या उमेदवारीमुळे निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. आता सर्वांचे लक्ष महायुतीच्या अधिकृत भूमिकेकडे आणि डॉ. खारकर यांच्या पुढील राजकीय रणनीतीकडे लागले आहे.
तर अमरावतीच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला असून आगामी काळात या निवडणुकीचे चित्र आणखी स्पष्ट होणार आहे. अशाच वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज अमरावती.



