citynewsLatest NewsMaharashtraWashim

वारंवार खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी संतप्त; कामरगाव महावितरण कार्यालयावर धडक

कामरगाव सर्कल अंतर्गत उंद्री धरण, टाकळी आणि बेंबळा शेतशिवारातील कृषी पंपांचा वीजपुरवठा मागील अनेक दिवसांपासून वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. सततच्या वीजखंडितेमुळे संत्रा, हळद, लिंबू आणि इतर महत्त्वाच्या पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याने मोठ्या नुकसानाची भीती व्यक्त केली जात आहे.

कडाक्याच्या उन्हामुळे आधीच पिकांवर ताण निर्माण झाला असताना वीजपुरवठा खंडित होत असल्याने हाता-तोंडाशी आलेली पिके करपण्याच्या मार्गावर असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. वारंवार तक्रारी करूनही महावितरण प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत संतप्त शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी थेट महावितरण कार्यालयावर धडक दिली.

मात्र कार्यालयात पोहोचल्यानंतर सहाय्यक अभियंता रजेवर असल्याचे सांगण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांचा संताप आणखी वाढला. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आवश्यक असलेली तक्रार नोंदवही देखील कार्यालयात उपलब्ध नसल्याचे समोर आले. या प्रकारामुळे महावितरणच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

यावेळी सर्कल प्रमुख शरद तुमसरे यांनी वरिष्ठ अभियंत्यांशी संपर्क साधून परिस्थितीची गंभीरता त्यांच्या निदर्शनास आणून दिली. शेतकऱ्यांनी वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी करत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

कामरगावातील या प्रकारामुळे महावितरण प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button