citynewsIndia NewsLatest NewsMaharashtra

NEET पेपरफुटीचा उगम थेट ‘NTA’मधून? CBIचा दिल्ली न्यायालयात खळबळजनक दावा

नवी दिल्ली : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) दिल्ली न्यायालयात धक्कादायक माहिती दिली आहे. या पेपरफुटीचा उगम थेट परीक्षा घेणाऱ्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेशी (NTA) संबंधित व्यक्तीकडून झाला असल्याचा दावा CBIने केला आहे.

CBIच्या वतीने बाजू मांडताना सरकारी वकील नीतू सिंग यांनी न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणातील पहिला अटक आरोपी शुभम खैरनार याने पुण्यातील एका व्यक्तीकडून प्रश्नपत्रिका मिळवली होती. संबंधित व्यक्तीने ही प्रश्नपत्रिका “NTAशी संबंधित स्रोताकडून” मिळवली होती, असे तपासात समोर आले आहे.

राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) ही केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेली स्वायत्त संस्था असून, वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या NEET-UG परीक्षेचे आयोजन करते.

शुभम खैरनार याला १२ मे रोजी नाशिकमधून अटक करण्यात आली होती. विशेष म्हणजे, त्याच दिवशी ३ मे रोजी झालेल्या NEET-UG परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचे प्रकरण समोर आले होते.

या प्रकरणात CBIने आतापर्यंत महाराष्ट्र, राजस्थान आणि हरियाणा येथून एकूण सात आरोपींना अटक केली आहे. सर्व आरोपींना ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीमध्ये आणण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

CBIच्या या खुलाशामुळे परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य या परीक्षेशी जोडलेले असल्याने, या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

आता तपासादरम्यान NTAमधील नेमका कोणता स्रोत या पेपरफुटीत सहभागी होता, याचा उलगडा होणार का, याकडे देशभरातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button