धामणगाव रेल्वेजवळ महामार्ग पोलिसांची धडक कारवाई; आंध्रप्रदेशातील तरुणाकडून ₹2.26 लाखांचा मुद्देमाल जप्त

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे परिसरात देवगाव महामार्ग पोलीस केंद्राच्या पथकाने मध्यरात्री केलेल्या कारवाईत एका संशयित तरुणाला ताब्यात घेत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि इतर साहित्य जप्त केले. या कारवाईमुळे महामार्गावरील संशयास्पद हालचालींवर पोलिसांची बारीक नजर असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.
माहितीनुसार, देवगाव महामार्ग पोलीस केंद्राचे पथक नियमित गस्त घालत असताना आयआरबी टोल नाक्याजवळ एक तरुण संशयास्पद हालचाली करताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली असता त्याची उत्तरे विसंगत आणि संशयास्पद आढळली.
यानंतर पोलिसांनी त्याच्या बॅग आणि वाहनाची झडती घेतली. झडतीदरम्यान आरोपीकडून ₹1 लाख 45 हजार 620 रुपयांची रोख रक्कम, दोन मोबाईल फोन, एक मोटारसायकल, आधार कार्ड आणि इतर संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले.
आरोपीची ओळख इम्रान मेहबूब शेख (वय 27), रा. नेल्लोर, आंध्रप्रदेश अशी झाली आहे. जप्त करण्यात आलेल्या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ₹2 लाख 26 हजार 456 रुपये इतकी आहे.
महामार्ग पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेचा आणि साहित्याचा संबंध नेमका कोणत्या गुन्ह्याशी आहे, याचा सखोल तपास सुरू आहे.
महामार्गावर वाढत्या गुन्हेगारी हालचालींना आळा घालण्यासाठी विशेष गस्त मोहीम राबविण्यात येत असून, ही कारवाई प्रभारी अधिकारी जमनादास सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.



