BuldhanacitynewsLatest NewsMaharashtra

नागेशवाडीत आरोग्य आणीबाणी! दूषित पाण्यामुळे 100 ते 150 नागरिकांना उलट्या-जुलाबाचा त्रास

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील नागेशवाडी गावात अचानक आरोग्य संकट निर्माण झाले आहे. आज सायंकाळपासून गावातील शेकडो नागरिकांना उलट्या आणि अतिसाराचा त्रास सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली. अवघ्या काही तासांतच सुमारे 100 ते 150 नागरिक आजारी पडल्याची माहिती समोर आली असून गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

आजारी पडलेल्या सर्व नागरिकांना तातडीने मेहकर येथील ग्रामीण रुग्णालय तसेच जानेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रुग्णांवर सलाईनसह आवश्यक उपचार सुरू असून वैद्यकीय पथक परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, संपूर्ण गावाला एका विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो. हे पाणी दूषित झाल्यामुळेच अचानक मोठ्या प्रमाणावर उलट्या-जुलाबाची साथ पसरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत असून, त्यामुळे आरोग्य विभागाची धावपळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाचे पथक नागेशवाडी गावात दाखल झाले असून पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. तसेच गावात औषध फवारणी, स्वच्छता आणि जनजागृतीचे काम सुरू करण्यात आले आहे.

या घटनेमुळे मेहकर तालुक्यात खळबळ उडाली असून, प्रशासनाच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी दूषित पाण्याचा स्रोत शोधून तातडीने पर्यायी स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे.

आता पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल काय येतो आणि या आरोग्य संकटावर प्रशासन कितपत प्रभावीपणे नियंत्रण मिळवते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button