citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

“ऑपरेशन थंडर” अंतर्गत नागपूर पोलिसांची कारवाई; गांजा विक्री करणारी महिला अटकेत

नागपूर शहरात अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या “ऑपरेशन थंडर” मोहिमेंतर्गत कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या एका महिलेला अटक केली आहे. महल परिसरात संशयास्पद हालचाली करत असताना पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई केली. या घटनेमुळे अमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून “ऑपरेशन थंडर” ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून, शहरात अमली पदार्थ विक्री आणि तस्करीविरोधात पोलिसांकडून कठोर कारवाया केल्या जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कोतवाली पोलिसांचे पथक गुन्हेगारांचा शोध घेत नियमित पेट्रोलिंग करत होते. यावेळी महल परिसरातील उद्योगी नगर येथे एका वृद्ध महिलेच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी तिच्याकडे जाण्याचा प्रयत्न करताच संबंधित महिला घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली.

मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत तिला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान तिने आपले नाव चांदबानो मोहम्मद हातम असल्याचं सांगितलं.

यानंतर पोलिसांनी तिच्या ताब्यातील विविध रंगांच्या प्लास्टिक पिशव्यांची तपासणी केली. तपासणीदरम्यान पिशव्यांमध्ये एकूण 648 ग्रॅम गांजा आढळून आला. या कारवाईत पोलिसांनी गांजासह रोख रक्कम असा एकूण 12 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

प्राथमिक तपासात आरोपी महिला आर्थिक फायद्यासाठी गांजा विक्री करत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, नागपूर पोलिसांकडून शहरात अमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबवली जात असून, ड्रग्ज आणि गांजा विक्रेत्यांवर सातत्याने कारवाई केली जात आहे. “ऑपरेशन थंडर”मुळे शहरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नशामुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून सुरू असलेल्या या मोहिमेकडे आता नागरिकांचंही लक्ष लागलं असून, पुढील काळात अशाच कारवाया अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button