43 वर्षांची प्रतीक्षा संपली! बडनेराला प्रथमच मिळाला “मिनी महापौर” पदाचा मान

अमरावती महानगरपालिका स्थापनेनंतर तब्बल 43 वर्षांनी प्रथमच बडनेरा झोन क्रमांक 4 ला झोन सभापती अर्थात “मिनी महापौर” पदाचा बहुमान मिळाला आहे. या ऐतिहासिक क्षणामुळे बडनेरा परिसरात आनंद आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून, पदग्रहण सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला.
स्वाभिमान पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक किशोर जाधव यांची झोन सभापती अर्थात मिनी महापौर पदी निवड करण्यात आली. या निवडीनंतर कार्यकर्ते आणि नागरिकांनी घोषणाबाजी करत आनंद साजरा केला. अनेकांनी फटाके फोडून आणि पुष्पवृष्टी करत या क्षणाचं स्वागत केलं.
पदग्रहण सोहळ्याला स्वाभिमान पक्षाचे प्रमुख मार्गदर्शक सुनील राणा, राष्ट्रीय अध्यक्ष निळकंठ कात्रे, गटनेते नाना आमले, अजय जैस्वाल, रजनी डोंगरे, गौरी मेघवानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थिती लावली होती.
यावेळी नवनिर्वाचित मिनी महापौर किशोर जाधव यांचा संपत्नीक शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे त्यांच्या आई-वडिलांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. त्यामुळे कार्यक्रमाला भावनिक रंग चढला आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत केलं.
पदग्रहणानंतर बोलताना किशोर जाधव यांनी मिनी महापौर पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचं आश्वासन दिलं. बडनेरा परिसराच्या विकासासाठी प्राधान्याने काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच या निवडीबद्दल आमदार रवी राणा आणि कार्यक्रमासाठी पुढाकार घेणारे नगरसेवक अजय जैस्वाल यांचेही त्यांनी आभार मानले.
दरम्यान, 43 वर्षांनंतर बडनेराला हा मान मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे. परिसरातील विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी नव्या मिनी महापौरांकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
बडनेरासाठी हा क्षण खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरला असून, आता या पदाच्या माध्यमातून परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी आशा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.



